परभणी : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याबरोबर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात पुढाकार घेतला असून, आपल्या पहिल्याच राजकीय खेळीने बाबाजानी यांनी काही कालखंडानंतर राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसून आले.

मनमानी पद्धतीने कामकाज करणे, बाजार समितीच्या हिताच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करणे, कुटुंबीयांना लाभ मिळवून देणे आणि संचालकाचा विश्वास गमवणे या कारणावरून पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्याविरुद्ध महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी व विक्री विकास व विनियम अधिनियमान्वये जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे माजी आमदार व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ३१) संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

सभापती अनिल नखाते यांच्याविरुद्ध संचालकांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार आणि स्वतःच्या कुटुंबीयांना योजनांचे लाभ मिळवून देण्याचा ठपका या अविश्वास प्रस्तावात ठेवण्यात आला आहे. संचालकांमध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि सईद खान यांच्या गटातील संचालकांचा समावेश आहे. त्यामध्ये एकनाथ घांडगे, किरण टाकळकर, संतोष गल्बे, संजीव सत्वधर, गणेश दुगाणे, शेख दस्तगीर शेख हसन, शाम धर्मे, अशोक आरबाड, संदीप टेंगसे, आनंद धनले, सयद गालीब सयद इस्माईल आदींच्या स्वाक्षरी आहेत. अविश्वास प्रस्तावाच्या या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

अनिल नखाते हे एकेकाळचे बाबाजानी यांचेच कार्यकर्ते होते. बाबाजानी यांच्या नेतृत्वाला फारकत घेऊन नखाते यांनी वेगळी चूल मांडली. बाजार समितीत बाबाजानी यांना मानणारे काही संचालक आहेत. आता सईद खान यांच्याही संचालकांनी अनिल नखाते यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाबाबत भूमिका घेतल्याने हे नखाते यांच्यासमोर मोठे आव्हान ठरले आहे.