देशातल्या विधानमंडळांमध्ये सर्वात जास्त काळ काम करणारं विधानमंडळ हे महाराष्ट्राचं आहे. देशातल्या विधानमंडळांमध्ये सर्वाधिक काळ चर्चा करणारं विधानमंडळही महाराष्ट्राचं आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
माणसाला कुत्रा चावतो तेव्हा बातमी होत नाही. पण कुत्र्याला माणूस चावला तर बातमी होते. तसंच जेव्हा सभागृहात काही गोंधळ होतात, वादावादी होते तेव्हा त्याला खूप प्रसिद्धी मिळते. सभागृह बंद पाडलं की प्रसिद्धी अधिक मिळते. मात्र तेच सभागृह तो वेळ भरुन काढण्यासाठी रात्री बारा, एक, दोन वाजेपर्यंत सुरु असतं, चर्चा करुन त्यातून समाजाला काही मिळालं पाहिजे अशा प्रकारे उत्तर प्राप्त करुन घेतं. त्याची बातमी तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही.
आत्ता आपण समाज माध्यमांच्या दुनियेत आहोत. समाज माध्यमांमध्ये रिल्स चालतात कारण त्या तीस सेकंदांच्या असतात. रिल्स का चालतात? तर लोकांची एकाग्र होण्याची क्षमताच कमी झाली आहे. ३० सेकंद किंवा एक मिनिट यापेक्षा कुणी एका बातमीवर थांबतच नाही. अशा संक्रमणाच्या काळात आपण जो अभ्यासवर्ग घेत आहोत तो लोकशाहीचं ज्ञान पोहचण्यासाठी होतो. आपल्या व्यवस्था किती चांगल्या आहेत हे समजतं.
वेगवेगळ्या प्रकारच्या समितींच्या द्वारे कामकाज चालतं. बजेटवर या समित्या काम करत असतात. अंदाज समिती जाब विचारु शकते. खर्च का केला नाही? किंवा खर्च योग्य का केला नाही. लोकलेखा समितीही अ असते. त्यामुळे सरकार भगवान भरोसे चालत नाही तर सरकार एका प्रक्रियेतून चालतं. सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम विधानमंडळ करत असतं. आमच्या संविधानाने विधान मंडळाला जे अधिकार दिलेत त्यानुसार प्रत्येक सामान्य माणसाची समस्या सोडवण्याचे अधिकार आपल्याला दिले आहेत. त्यामुळेच आपला जो अभ्यास वर्ग चालणार आहे त्यात उपस्थितांच्या लक्षात येईल आणि लोकशाहीची प्रगल्भता सगळ्यांपर्यंत पोहचेल. लोकशाहीवरचा विश्वास वाढला पाहिजे, ती वाढीला लागण्याची लालसा वाढली पाहिजे यासाठी मी या अभ्यास वर्गाला शुभेच्छा देतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.