लोकसत्ता वार्ताहर
चंद्रपूर: चंद्रपूर महानगर क्षेत्र व दोन ग्रामपंचायती परिसरात लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे ( लॉकडाउन) रुग्ण संख्येमध्ये घट दिसून आली. या काळात नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी १७ ते २६ जुलैपर्यंत लावलेली टाळेबंदी अर्थात लॉकडाउन शनिवार दि. २५ जुलै पासून उठवत असल्याचे जाहीर केले. नागरिकांनी यापुढे देखील शारीरिक अंतर राखावे, मास्कचा वापर करावा व बाजारात गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, ऊर्जानगर व दुर्गापुर या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये दि. १७ जुलै ते २६ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले होते. शासनातर्फे लॉकडाऊनचे आदेश तसेच अतिरिक्त निर्बंध या क्षेत्रात घोषित केले होते. त्याचा गेल्या काही दिवसात चांगला परिणाम दिसून आलेला आहे. रुग्ण संख्येत घट आली आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन २५ जुलै रोजी उठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

२५ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून जे लॉकडाऊनचे अतिरिक्त निर्बंध आहेत. ते उठविण्यात येत आहेत. लॉकडाऊन उठवत असताना पूर्वी ७ वाजेपर्यंत जी आस्थापना उघडण्याची वेळ होती. ती कमी करून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या आस्थापनांना सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र बाजारपेठेत लोकांनी मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, बंधनकारक राहील.
प्रत्येक दुकानांमध्ये त्यांनी सॅनीटायजर किंवा हॅन्ड वॅाशची सुविधा असणे बंधनकारक राहील. ज्या बाजारपेठेत वा दुकानात हे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापना व दुकाने बंद करण्याचे संपूर्ण अधिकार प्रशासनास असेल. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

लॉकडाउनच्या काळात शहरामध्ये महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात अतिशय कल्पकतेने व प्रभावीपणे मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासणी केलेली आहे. तसेच पहिले ४ दिवस आपल्याकडे संपूर्णपणे बाजारपेठ आणि दुकाने बंद होती. त्यानंतरही केवळ सकाळी ९ ते २ या कालावधीपुरतेच अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंसाठी दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे, याचा चांगला परिणाम दिसून आलेला आहे. त्याच्यामध्ये सातत्य रहावे यासाठी जी काळजी आपण लॉकडाऊनमध्ये घेतली तीच काळजी या काळातही घ्यावी, असे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No lockdown in chandrapur from today scj
First published on: 24-07-2020 at 21:11 IST