भारतामध्ये कोणीही अल्पसंख्याक नसून, देशातील प्रत्येक व्यक्ती सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि गुणसूत्रांनी हिंदूच असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय होसाबळे यांनी केला. ते शुक्रवारी संघाच्या नागपूर येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत बोलत होते. तुम्ही कोणाला अल्पसंख्याक मानता? आम्ही कोणालाही अल्पसंख्याक मानत नाही. अल्पसंख्याक असा प्रकारच अस्तित्वात नसल्यामुळे देशात ही संकल्पनाच नसावी, असेही त्यांनी म्हटले.
भारतात जन्माला आलेला प्रत्येकजण हिंदू आहे, हे आजपर्यंत मोहन भागवतांनी २० वेळा तरी सांगितले असेल. या गोष्टीचा कोणी स्वीकार करो अथवा न करो पण सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि गुणसूत्रांनी ते सर्व हिंदूच आहेत, असा दावा होसाबळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दरवाजे अन्य धर्मियांसाठी खुले केले जाणार का, या प्रश्नावर बोलायचे त्यांनी टाळले.
तुम्ही ज्यांना अल्पसंख्याक म्हणून संबोधता तसे अनेकजण तुम्हाला संघाच्या शाखांवर दिसून येतील. ते संघाचे कार्यकर्ते आहेत.  राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून महिलाही संघाच्या कार्याला हातभार लावतात. संघाच्या शाखा वगळून अन्य ठिकाणी सर्वत्र महिला संघासाठी कार्यरत आहेत, यापैकी काहीजणी तर पूर्णवेळ कार्यकर्त्या असल्याचेही होसाबळे यांनी यावेळी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले.