जनतेच्या भावनांना भडकवून सत्तेत आले तरी राजकारणात अनुभवाची गरज असते, असा टोला माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य खासदार सीताराम येचुरी यांनी ‘आप’ला लगावला. मंदी व महागाईमुळे जनता त्रासली असून तिला ‘राहत’ हवी आहे. त्यामुळे ती पर्याय शोधत आहे. अशा स्थितीत जनतेला दिलासा देणारे, देशाची एकता व अखंडता कायम ठेवणारे व अर्थव्यवस्थेला मजबुती व स्थैर्य देणारे सरकार देशात आणण्याची गरज असताना देशात उगाचच ‘नमो’ राग आळवून एकप्रकारे गोंधळ घातला जात आहे. देशाला नेता नव्हे, तर नवी नीती हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. येचुरी म्हणाले, सध्या भांडवलदारांच्या नफेखोरीला वाव दिला जात आहे. वारेमाप कर सवलती दिल्या जात आहेत. त्या टाळून व भ्रष्टाचारास आळा घातल्यास उपलब्ध पैसा पायाभूत सोयी वाढविण्यासाठी खर्च केला जाऊ शकतो. देशातील जनता आधीच महागाई व मंदीमुळे पडणाऱ्या आर्थिक भाराने त्रासली आहे. त्यामुळे ती पर्याय शोधत आहे. जनतेला दिलासा देणारे, देशाची एकता व अखंडता कायम ठेवणारे, तसेच अर्थव्यवस्थेला मजबुती व स्थैर्य देणारे सरकार देशात हवे आहे. किंबहुना, ती आपली जबाबदारी आहे.