शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालयाची इमारत देण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने नकारार्थी सूर लावल्याने चालू शैक्षणिक सत्रापासून येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. केवळ इमारत मिळत नसल्यामुळेच यावर्षीही महाविद्यालय सुरू होणार नसल्याचे संकेत मिळाल्याने स्थाानिक विद्यार्थी व पालकांमध्ये निराशा व्यक्त केली जात आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. आज या गोष्टीला सात वर्षांचा कालावधी लोटला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे वैद्यकीय महाविद्यालय दिले, परंतु वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासकीय इमारत मिळत नसल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा होताच तत्कालीन जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी बायपासवर २५ एकर जागा तातडीने उपलब्ध करून दिली. त्यानंतर मेडिकल कौन्सील ऑफ इंडियाने या जागेची पाहणी करून ती निश्चित केली, परंतु या जागेवर इमारत उभी करण्यास किमान चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर २०१३-१४ च्या शैक्षणिक सत्रापासून तातडीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी म्हणून नोडल अधिकारी डॉ. पी.जी.दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या शहरातील इंदिरा इंस्टिटय़ूट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतीगृह व वेकोलिचे एरिया हॉस्पिटलच्या इमारतीची पाहणी केली होती. यातील इंदिरा इंस्टिटय़ूट या खासगी शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे भाडे अधिक असल्याने हा करार तेव्हाच रद्द झाला. त्यानंतर वेकोलिच्या एरिया हॉस्पिटलच्या इमारतीसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, ही इमारत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अतिशय लहान होईल म्हणून हा प्रस्ताव सुध्दा बारगळला. शेवटी रामनगर येथील क्षय रुग्णालयातील शंभर खाटांचे स्वतंत्र महिला व बाल रुग्णालयाची इमारत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य खात्याकडे करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांपासून ही इमारत मिळावी म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु सार्वजनिक आरोग्य खात्याकडून ही यासंदर्भात सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, आता २०१४-१५ चे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक सत्रापासून स्वतंत्र महिला रुग्णालयाची इमारत मिळावी म्हणून नव्याने प्रयत्न सुरू केले होते, परंतु आरोग्य विभागाने ही इमारत देण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी या शहरात एकही शासकीय इमारत मिळत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या शहरात शासनाच्या बहुसंख्य इमारती आहेत. यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अगदी मागे ज्युबिली हायस्कुलची भव्य इमारत आहे, तसेच या शहरात अन्य इमारती सुध्दा आहेत. त्या वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी म्हणून ताब्यात घेतल्या जाऊ शकतात, तसेच कस्तुरबा मार्गावरील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर वष्रेभरात इमारत उभी करून देऊ, असे माजी खासदार नरेश पुगलिया व महापौर संगीता अमृतकर यांनी जाहीर केले होते, परंतु वैद्यकीय शिक्षण खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने इमारतीचा प्रश्न अधिक जटील झाल्याचे बोलले जात आहे.
केवळ इमारत मिळत नाही म्हणून वैद्यकीय महाविद्यालय चालू शैक्षणिक सत्रापासून सुरू होत नसेल तर ही चंद्रपूरकरांसाठी अतिशय लज्जास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी व पालक व्यक्त करत आहेत.
किमान वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याइतकी तरी जागा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी आता विद्यार्थी करत आहेत.
दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी म्हणून नोडल अधिकारी डॉ.पी.जी.दीक्षित यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी चालू शैक्षणिक सत्रापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. त्याला एकमेव कारण म्हणजे, सार्वजनिक आरोग्य खात्याने स्वतंत्र महिला रुग्णालयाची इमारत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याची या शहरात जागा नाही व अन्य शासकीय जागा मिळत नसल्याने ही अडचण निर्माण झाली असल्याची माहितीही त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.

राजकीय अनास्थेचा बळी
केवळ राजकीय अनास्थेमुळे सुध्दा चंद्रपूर येथे मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बळी ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया या एकमेव नेत्याकडूनच वैद्यकीय महाविद्यालय तातडीने सुरू व्हावे म्हणून प्रयत्न होत आहेत. मात्र, अन्य नेते पाठपुरावा करत नसल्याची माहिती यासंदर्भातील काम बघणाऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. पालकमंत्री संजय देवतळे, खासदार हंसराज अहीर, आमदार नाना शामकुळे यांच्याकडून तर साधा पाठपुरावा सुध्दा होत नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयाचा फायदा हा या तसेच गडचिरोली जिल्ह्य़ातील सर्व रुग्णांना होणार आहे. त्यामुळे राजकीय स्पर्धा बाजूला ठेवून सर्वानी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.