बंद पडलेल्या वाहनांमुळे अपघातांना निमंत्रण

पुणे/ लोणावळा : 

द्रुतगती मार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास वा वाहनाचे चाक पंक्चर झाल्यास बंद पडलेले वाहन ओढून नेण्याची जबाबदारी पूर्णत: टोल वसूल तसेच या मार्गाची देखभाल करणाऱ्या कंपनीची आहे. मात्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहन ओढून नेण्याची यंत्रणा (टोईंग) उपलब्ध नसल्याची माहिती उजेडात आली आहे. द्रुतगती मार्गालगतच्या गावांमध्ये उपलब्ध असलेल्या टोईंग करणाऱ्या क्रे नचे शुल्क अवाजवी असल्याने हा भार वाहनचालकांवर पडत आहे.

द्रुतगती मार्गावर बंद पडलेल्या वाहनांवर दुसरे वाहन आदळून अपघात होतात. द्रुतगती मार्गावर यापूर्वी टोल वसुली करणारी जी कंपनी होती त्या कंपनीची मुदत संपल्यानंतर अन्य एका कंपनीला देखभाल तसेच टोलवसुलीचा ठेका देण्यात आला आहे, अशी माहिती महामार्ग पोलीस दलाचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. द्रुतगती मार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास ते ओढून नेण्याची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या कंपनीची आहे. त्यांनी वाहने ओढून नेण्यासाठी त्वरित क्रेन  उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असेही मोहिते यांनी सांगितले.

द्रुतगती मार्गालगतच्या गावांमधील काहीजण बंद पडलेले वाहन ओढून नेण्यासाठी क्रेन उपलब्ध करून देतात. पण त्यासाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. टोलवसूल करणाऱ्या कंपनीने या क्रेन उपलब्ध करून देणाऱ्या वाहनचालकांची यादी तयार करून त्यांचे दर निश्चित करावेत. जेणेकरून द्रुतगती मार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास वाहनचालकांना तातडीने टोईंग यंत्रणा उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या पंधरवडय़ात द्रुतगती मार्गावर रात्री साडेदहाच्या सुमारास देहूरोडजवळील किवळे परिसरात संचेती रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. केतन खुर्जेकर यांची मोटार बंद पडली. डॉ. खुर्जेकर आणि त्यांच्याबरोबर असलेले दोन सहकारी डॉक्टर मुंबईहून पुण्याकडे जात होते. मोटार बंद पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मोटारीचे चाक बदलत असताना डॉ. खुर्जेकर, अन्य दोन डॉक्टर तसेच मोटारचालकाला भरधाव खासगी प्रवासी बसने धडक दिली. या अपघातात डॉ. खुर्जेकर तसेच मोटारचालकाचा जागीच मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर द्रुतगती मार्गावर टोईंग करणारी वाहने सहजपणे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या अनेकांनी केल्या.

अकरा हजार जणांवर कारवाई

गेल्या काही दिवसांत महामार्ग पोलिसांनी मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या (लेन कटिंग) वाहनचालकांवर कारवाई तीव्र केली आहे. लेन कटिंग केल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसात अकरा हजार वाहन चालकांवर लेन कटिंग केल्या प्रकरणी कारवाई केली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ९४ किलोमीटर लांबीचा आहे. महामार्ग पोलिसांची पथके द्रुतगती मार्गावर गस्त घालतात. एखादे वाहन अपघातग्रस्त झाल्यास किंवा बंद पडल्यास त्वरित महामार्ग पोलिसांच्या मदत कक्षाशी (एक्सप्रेस वे हेल्पलाईन क्रमांक- ९८२२४९८२२४) संपर्क साधावा. जेणेकरून वाहनचालकांना त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाईल.   

 – मिलिंद मोहिते, महामार्ग पोलीस पोलीस अधीक्षक, पुणे विभाग