ऐन पावसाळ्यात दुथडी वाहणाऱ्या कृष्णेचे पात्र सांगलीजवळ कोरडे पडले असून यामुळे नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे सांगलीकरांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कृष्णाकाठची पाणी परिस्थिती सुधारावी यासाठी कोयना धरणातून १२०० क्युसेक्स पाणी सोमवारपासून सोडण्यात येत आहे. बुधवार सकाळपर्यंत हे पाणी सांगलीच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार आहे.
दहा वर्षांत प्रथमच ऐन पावसाळ्यात पहिल्यांदाच सांगलीच्या कृष्णाचे पात्र कोरडे पडले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने ओढे नाले यांना पाणीच नसल्याने नदीच्या पात्रात पाण्याची आवकच नाही. यातच ओढे व नाल्यांवर असलेल्या विहीरीतून पिकासाठी पाण्याचा उपसा सातत्याने सुरू असल्याने ओढे कोरडे पडले आहेत. यातच ताकारीचे पंप सुरू करण्यात आल्याने नदीतील पाण्याचा प्रवाहच आटला आहे. ताकारीपासून खाली येणारे पाणी थांबल्याने सांगलीच्या बंधाऱ्यापर्यंतचे पात्र ठणठणीत कोरडे पडले आहे.
नदीत सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत आहेच, पण नदीकाठावर असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांनाही पाणी उपलब्ध होत नाही. यामुळे कोयना धरणातून १२०० क्युसेक्स पाणी नदीपात्रात आजपासून सोडण्यात आले आहे.
येत्या एक दोन दिवसात म्हैसाळ योजनेचे पंपही सुरू करण्यात येणार आहेत. मात्र या योजनेसाठी वारणा धरणातील पाण्याचा वापर होतो. चांदोलीचे वारणा धरण ९२ टक्के भरले असल्याने म्हैसाळ योजनेसाठी पाण्याची सध्या तरी कमतरता भासणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाई सदृष परिस्थितीचा विचार करून ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि आरफळ योजना तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या दोन महिन्याच्या काळातील वीज बिलाची तरतूद शासन करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2015 रोजी प्रकाशित
ऐन पावसाळ्यात कृष्णेचे पात्र कोरडे
ऐन पावसाळ्यात दुथडी वाहणाऱ्या कृष्णेचे पात्र सांगलीजवळ कोरडे पडले असून यामुळे नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे सांगलीकरांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

First published on: 26-08-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water in krishna river in rainy season