नांदेड : कादंबरीकार बाबू बिरादार यांनी जिल्हा सहकारी बँकेतील निरीक्षकपदाची नोकरी सांभाळून मराठवाड्यातील कादंबरी लेखनविश्व समृद्ध केले. अनेक मान-सन्मान त्यांच्या वाट्याला आले; पण मंगळवारी देगलूर येथे त्यांचे निधन झाले, तरी जिल्हा बँकेचे संचालक आणि प्रशासन अनभिज्ञ राहिले. या व्रतस्थ लेखकाच्या अंत्यदर्शनासाठी बँकेतर्फे एकही जबाबदार प्रतिनिधी हजर राहिला नाही. त्या भागातील लोकप्रतिनिधींनीही उदासीनता दाखवली.

बिरादार यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी देगलूर तालुक्यातील धनगरवाडी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर नांदेड आणि इतर भागातील लेखक-कवींनी समाज माध्यमांतून शोकसंवेदना व्यक्त केली. प्राचार्य नागनाथ पाटील, कवी देवीदास फुलारी यांच्यासह नांदेडमधील मसाप नांदेड शाखेचे पदाधिकारी आणि बिरादारांचे चाहते देगलूरला गेले. धनगरवाडी हे गाव कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून बिरादार यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी फार मोठा जनसमुदाय उपस्थित होता; पण आपल्या बँकेत दीर्घकाळ सेवा बजावलेला व महाराष्ट्रभर मान्यता पावलेला लेखक काळाच्या पडद्याआड गेला, तरी नांदेड बँकेच्या प्रशासनाला बुधवारी दुपारपर्यंत त्याची गंधवार्ताही नव्हती.

बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, आपल्या बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांपैकी काल कोणाचे निधन झाले, अशी विचारणा त्यांनी बिलोली येथील काही कर्मचाऱ्यांकडे केल्यानंतर एका कर्मचाऱ्याने त्यांना बाबू बिरादार यांचे नाव सांगितले. बिरादार यांचे मंगळवारी सकाळी देगलूरमधल्याच एका खासगी रुग्णालयात निधन झाले. देगलूरमधील त्यांच्या हितचिंतकांनी ही दुःखद बातमी समाज माध्यमांतून त्वरेने प्रसृत केली. त्यानंतर समाज माध्यमांवर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली, तरी जिल्हा बँकेच्या अनेक संचालकांना तसेच अधिकाऱ्यांना बिरादार हे आपल्या बँकेच्या सेवेमध्ये होते, ही बाबच ठाऊक नसल्याचे दिसून आले. राजकीय मंडळींच्या या अनास्थेबद्दल नांदेडमधील अनेक लेखकांनी बुधवारी आश्चर्य व्यक्त केले.