कोकणचा शेजार लाभलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या पर्वतरांगांत मुसळधार पाऊस सुरू आहे. प्रवरा नदीच्या उगमस्थानाजवळील रतनवाडी येथे चोवीस तासांत या पावसाळय़ातील दुपारी म्हणजे साडेसात इंच पाऊस पडला. भंडारदऱ्याच्या पाणीसाठय़ाने सव्वा टीएमसीचा टप्पा गाठला असून, धरणाच्या पाणीसाठय़ात चोवीस तासांत चारशे दशलक्ष घनफुटाने वाढ झाली. हरिश्चंद्रगड या पर्वत परिसरातील मुसळधार पावसामुळे मुळा नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे. कृष्णवंती या प्रवरेच्या उपनदीवरील वाकी तलावात नव्याने पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सून सक्रिय झाला. दिवसागणिक पावसाचा जोर वाढत आहे. बुधवारी रात्री घाटघर, साम्रद, रतनवाडी परिसरास पावसाने झोडपून काढले. गुरुवारी दुपापर्यंत पावसाचा जोर टिकून होता. त्यानंतर काही काळ त्याने विश्रांती घेतली. मात्र दोनतीन दिवसांच्या पूर्वानुभवावरून रात्री पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे गुरुवारी या पावसाळय़ातील सर्वाधिक म्हणजे १८७ मिमी पावसाची नोंद झाली. घाटघर १४५, पांजरे ६६, भंडारदरा ५१, वाकी ३९ येथेही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे पाणलोट क्षेत्रातील लहानमोठे ओढेनाले आता जोमाने वाहू लागले आहेत. त्यामुळे भंडारदरा धरणात नव्याने येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही दिवसागणिक वाढत चालले आहे. मागील चोवीस तासांत धरणातील पाणीसाठा चारशे दशलक्ष घनफुटाने वाढला. सायंकाळी भंडारदरा धरणात १ हजार २१९ दशलक्ष घनफूट पाणी होते. धरणातील पाण्याची पातळी आता १०९ फुटांपेक्षा जास्त झाली आहे. पाणीपातळी वाढल्यामुळे धरणातून सोडण्यात येत असणाऱ्या विसर्गातही हळूहळू वाढ होत आहे. आज भंडारदरा धरणातून ५८२ क्युसेक पाणी आवर्तनासाठी निळवंडे धरणात सोडण्यात येत होते. कळसूबाई पर्वतशिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या वाकी-बारी-वारंघुशी परिसरात दोन दिवस चांगला पाऊस पडल्यामुळे कृष्णवंतीवरील वाकी तलावात नव्याने पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
मुळा पाणलोट क्षेत्रातही असाच मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून ती दुथडी भरून वाहू लागली आहे. आज सकाळी कोतूळजवळ मुळा नदीच्या पात्रातून २ हजार ६३५ क्युसेक पाणी वाहत होते  व पाणीपातळीत सातत्याने वाढ सुरू होती. त्यामुळे मुळा धरणातही आता कोणत्याही क्षणी नवीन पाणी येण्यास प्रारंभ होईल.
तालुक्याच्या पूर्व भागाला मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. भंडारदऱ्यापासून राजूपर्यंतच्या पट्टय़ात मध्यम स्वरूपाच्या काही पावसाच्या सरी पडल्या. अकोले शहर आणि परिसरात मात्र रिमझिम म्हणता येईल इतपतच पाऊस पडला. पूर्व भागात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now mula river overflow
First published on: 18-07-2014 at 03:43 IST