नगर व नाशिक येथे पुणे विद्यापीठाचे केवळ सेवा, सुविधा देणारे उपकेंद्र स्थापन न करता, त्यास अधिक व्यापक स्वरुप देऊन शैक्षणिक उपक्रम राबवणारे उपकेंद्र सुरु करण्याचा प्रत्येकी १२६ कोटी रुपये खर्चाचा नवा प्रस्ताव विद्यापीठाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी आज नगरमध्ये ही माहिती दिली. नगरचे रहिवासी व नांदेडच्या रामानंदतीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे यांची लखनौ विद्यापीठाच्या कुलगुरु पदी नियुक्ती झाली आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने डॉ. निमसे यांचा डॉ. गाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानिमित्ताने डॉ. गाडे येथे आले होते. कार्यक्रमात माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्यासह इतर वक्तयांनी रेंगाळलेल्या विद्यापीठ उपकेंद्राचा विषय उपस्थित केला, त्यावर खुलासा करताना कुलगुरुंनी ही माहिती दिली.
उपकेंद्रासाठी नगर येथे ८३ व नाशिक येथे १२० हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे. जागा विद्यापीठाच्या नावावर करुन घेण्याची प्रक्रिया पार पडली आहे. परंतु विद्यापीठाचे केवळ सेवा, सुविधा पुरवणारे उपकेंद्र सुरु होऊ नये, त्याऐवजी येथे विद्यापीठाचे विविध शैक्षणिक उपक्रम राबवणारे ‘विद्यापीठाचे नगर कँपस’ असे त्याचे स्वरुप असावे, या उद्देशाने पुन्हा नवा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. प्रत्येकी १२६ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे. मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीतच तो मांडला जाणार होता. परंतु आता तो पुढील बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय इमारतीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध उपक्रम राबवण्यासाठी मुलभूत सुविधा असे त्याचे स्वरुप असेल. त्याचा मास्टर प्लॅनही सादर करण्यात आला आहे, राजकीय व्यक्तींनीही नवा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन कुलगुरु डॉ. गाडे यांनी केले. नगरच्या ताब्यात मिळालेल्या जागेस संरक्षक भिंत बांधली जाणार होती, त्यासाठी सुरुवातीला सव्वा कोटी रुपयांचे बजेट होते, प्रत्यक्षात खर्च साडेचार कोटी रुपये येणार आहे, मात्र विद्यापीठाला अडीच कोटी रुपयेच खर्च करण्याचे अधिकार होते, त्यामुळे या कामाला उशिर झाला, आता नुकतीच ही मर्यादा वाढवली गेली आहे, ५ कोटी रुपयापर्यंत खर्चाचे अधिकार मिळाले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.