सध्या मुलांना मिळणाऱ्या पोषण आहाराची स्थिती गंभीर होत चालल्याची माहिती समोर आली आहे. योग्य पोषण आहार मिळत नसल्याचा गंभीर परिणाम मुंबईतील मुलांवर दिसू लागला आहे. तसंच यामुळे त्यांचं वजन सामान्यापेक्षा कमी असून त्यांना अन्य रोग होण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे. प्रजा फाऊंडेशननं सादर केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ३ टक्के तर अंगणवाड्यांमधील १७ टक्के मुलांचं वजन सामान्यापेक्षा कमी असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.

माहिती अधिकाराखाली प्रजा फाऊंडेशननं यासंदर्भातील माहिती मागवली होती. त्यानुसार मुंबई महानगरपालिका आणि ‘इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्विस’कडून देण्यात आलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. २०१८-१९ या कालावधीत अंगणवाडीतील २.८६ लाख मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ४८ हजार ८४९ मुलांमध्ये पोषणाची कमतरता असल्याचं दिसून आलं. तर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील २.२६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ७ हजार ३८३ मुलांचं वजन त्यांच्या वयोमानानुसार आवश्यक वजनापेक्षा कमी असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, ‘सप्लीमेंटरी न्यूट्रीशन’साठी मुंबई महानगरापालिकेला अद्याप कोणताही ठेकेदार मिळाला नसल्याचंही प्रजाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी २५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. परंतु यासाठी अद्याप पैसे खर्च करण्यात आले नसल्याचंही यातून समोर आलं आहे. २०१७ मध्ये पोषण अभावामुळे ० ते १९ या वयोगटातील ३२ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, याबाबत अद्यापही कोणाला गाभीर्य नसल्याचं मत प्रजा फाउंडेशनचे संस्थापक निताई मेहता यांनी व्यक्त केलं.