न्यायालयात न जाण्याचे ओबीसी विभागाचे महाविद्यालयांना निर्देश

नागपूर : राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि फ्रिशिप थकवल्याने कायम विनाअनुदानित महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र आता राज्य सरकारने या महाविद्यालयांना न्यायालयात न जाता राज्याच्या अर्धन्यायिक व्यवस्थेचा वापर करा, असे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शुल्कमाफीची रक्कम २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात थकवण्यात येत आहे. या विभागाची  काही प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रिशिप (२०१०-११ पासून) देणे बाकी आहे. तसेच २०१९-२०, २०२०-२१ या वर्षांतील प्रलंबित दायित्व अंदाजे १८०० कोटी अदा करणे शिल्लक आहे. तसेच सन २०२१-२२ चे दायित्वसुद्धा यावर्षी येणार आहे. अशाप्रकारे शिष्यवृत्ती आणि फ्रिशिप थकवण्यात येत असल्याने कायम विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रम चालवणारी महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे. कर्मचारी संघटना संस्थांच्या विरोधात आंदोलन करू लागल्या आहेत. तर शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांनी सरकारविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने या विभागाला (इतर मागासप्रवर्ग बहुजन कल्याण) उच्च न्यायालयात निधी जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर इतर मागासप्रवर्ग बहुजन कल्याण विभागाने परिपत्रक काढून जून २०१८ पासून पर्यायी न्यायव्यवस्था, अर्धन्यायिक व्यवस्था गठित केली आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी या व्यवस्थेचा उपयोग करावा, असे निर्देश संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे, संघटनांना दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc department instructs colleges not to go to court over scholarship issue zws
First published on: 06-08-2021 at 01:56 IST