औरंगाबाद :  सौरपंप वाटपात महाराष्ट्राचा क्रमांक ओडिशा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, झारखंड यांच्या मागे आहे. ओडिशात तर पाच वर्षांपूर्वीपासूनच शेती आणि खेडय़ांमधील पाणीपुरवठय़ाची योजना सौरपंपावर चालवल्या जातात. ओडिशा आणि महाराष्ट्राचीच तुलना का तर वरील राज्यांचा सौरपंप पुरवठादार हा एक मराठी माणूस आहे म्हणून. एका अर्थाने पिकते तिथे विकत नाही, या म्हणीसारखा हा प्रकार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मराठी माणसाचे नाव आहे गुंडू साब्दे. लातूरचे भूमिपुत्र. गुंडू साब्दे हे काही वर्षांपूर्वी एम.टेक. होऊन अमेरिकेत गेले. तेथे त्यांना मोठय़ा पगाराची नोकरी, पाच एकरवर बडा बंगला, त्यात बगिचा आदी सुविधा. अशा वातावरणात साब्दे रमले. पण एक दिवस त्यांना भारतातील भारनियमन आणि विजेच्या समस्येची माहिती मिळाली. सुखाची नोकरी सोडून साब्दे यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. येणारा काळ सौरऊर्जेचा असेल, असा त्यांचा विश्वास. त्यामुळे त्यांनी भारतात येऊन सौरऊर्जेवरील उपकरणे तयार करण्याचा एक प्रकल्पच उभारला. तुळजापूर-बार्शी मार्गावरील केमवाडीत ५० एकर माळरान जमिनीवर हा प्रकल्प. त्यातून १० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होते. एखाद्या तालुक्याच्या गावाला पुरेल, एवढी ती वीजनिर्मिती आहे, असे साब्दे सांगतात.

पाच वर्षांपूर्वीपासून ओडिशातील सहाशे गावांतील पाणीपुरवठा योजना ही साब्दे यांच्या प्रकल्पांतर्गत निर्मित सौरपंप उपकरणावरून चालवली जाते. तर तेथील साडेतीन हजार शेतकऱ्यांकडे सौर कृषी पंप आहेत. ओडिशा सरकार तेथील शेतकऱ्यांकडून केवळ पाच टक्के रक्कम घेते व उर्वरित ९५ टक्के हे राज्य सरकार अनुदान रूपात देते. ओडिशा आणि झारखंड या दोन राज्यांत सर्वाधिक सौरपंप वाटप झालेले आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी साधारण एक एचपीचा सौरपंप लागतो. पाच एचपीसाठी साधारण चार लाख तर तीन एचपी पंपासाठी २ लाख ८० हजार रुपये अंदाजे खर्च येतो. या पंपाचे जीवनमान २० ते २५ वर्षांपर्यंतचे असते, असा साब्दे यांचा दावा आहे.

महाराष्ट्रातील पाणीपुरवठा योजनांची थकबाकी कोटय़वधीत आहे. औरंगाबाद जालना जिल्हय़ातील २४९८ योजनांची थकबाकी ६९ कोटींपेक्षा अधिक असून, त्यातूनच अवघ्या महाराष्ट्रातील गावांमध्ये सौरपंप बसवता येऊ शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

भांडुपमध्ये काम

मुंबईतील भांडुपमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी अडीच मेगावॉटच्या प्रकल्पातून ५००-५०० एचपीच्या पंपाद्वारे पाणीपुरवठा मुंबईला होतो. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येणारा काळ सौरऊर्जेचा आहे.

– गुंडू साब्दे

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha lead in solar pump use studies still continue in maharashtra
First published on: 24-06-2018 at 02:09 IST