शनिवारवाडा, कार्ला लेण्यांच्या प्रवेश शुल्कात वाढ

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने देशभरातील संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश शुल्कात वाढ केली आहे. पुणे विभागातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, कार्ला लेणी आणि भाजे लेणी या वास्तूंचे प्रवेश शुल्क १५ रुपयांवरून २५ रुपये करण्यात आले आहे.

पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अजंठा, एलोरा आणि एलिफंटा (घारापुरी) लेणी या तीन जागतिक वारसा वास्तू आहेत. पुणे विभागातील कार्ला लेणी, भाजे लेणी, शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस या चार वास्तूंचे प्रवेश शुल्क पूर्वी १५ रुपये होते, ते आता २५ रुपये करण्यात आले आहे. या स्थळांना भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांसाठीचे प्रवेश शुल्क २०० रुपयांवरून ३०० करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील लेणी, बिबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, लेण्याद्री येथील गणेश मंदिर आणि लेणी (जुन्नर), कान्हेरी गुंफा, पांडवलेणी गुंफा (पाथर्डी), रायगड किल्ला, हरिकोटा जुना किल्ला (अलिबाग) आणि सोलापूर येथील जुन्या किल्ल्यातील कारंजा बाग या राज्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे.  संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याबाबतच्या शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू झाली  आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने देशभरातील संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांकडून १ सप्टेंबर १९९६ पासून प्रवेश शुल्क घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी ‘जागतिक वारसा वास्तू’ आणि ‘आदर्श स्मारक’ अशी वर्गवारी करण्यात आली. या वास्तूंची देखभाल आणि दुरुस्ती करून त्यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने प्रवेश शुल्क आकारण्याची कल्पना पुढे आली होती.

केंद्रीय पुरातत्त्व विभागाला या प्रवेश शुल्कामुळे निधी मिळत असल्याने या वास्तूंची देखभाल आणि दुरुस्तीची किरकोळ कामे करणे शक्य होत आहे.

नवे प्रवेश शुल्क

ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्री स्मारक, दिल्लीचा हुमायूँ मकबरा, कुतुबमिनार, लाल किल्ला पाहण्यासाठी भारतीय आणि सार्क देशांतील नागरिकांसाठी प्रत्येकी ४० रुपये (‘कॅशलेस’साठी ३५ रुपये), तर परदेशी नागरिकांसाठी प्रत्येकी ६०० रुपये (‘कॅशलेस’साठी ५५० रुपये) एवढे प्रवेश शुल्क घेण्यात येत आहे.  सिकंदराबाद येथील अकबराचा मकबरा, मरियमचा मकबरा, इत्माद-उद-दौलाचा मकबरा, रामबाग, आग्रा येथील मेहताब बाग स्मारक, दिल्ली येथील जंतरमंतर, खान-ए-खान, पुराना किल्ला, तुघलकाबाद किल्ला, फिरोजशाह कोटला, सफदरजंग मकबरा पाहण्यासाठी भारतीय आणि सार्क देशांतील नागरिकांसाठी प्रत्येकी २५ रुपये (‘कॅशलेस’साठी २० रुपये), तर परदेशी नागरिकांसाठी प्रत्येकी ३०० रुपये (‘कॅशलेस’साठी २५० रुपये) शुल्क आकारण्यात येते