राहाता : शिर्डी येथील साईबाबा संस्थानला आज, गुरुवारी दुबईस्थित एका भक्ताने तब्बल १ हजार ६०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची व १ कोटी ५८ लाख ५१ हजार रुपये किमतीची “ॐ साई राम” ही दोन सुवर्णअक्षरे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली. भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. साईबाबांवर श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साईभक्त विविध प्रकारचे दान अर्पण करतात. अशाच दुबई येथील एका श्रद्धावान साईभक्ताने, बाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरात ‘ॐ साई राम’ अशी दोन नावे अर्पण करण्याची इच्छा अखेर पूर्ण केली. ही सुवर्ण अक्षरे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. या सुवर्ण अक्षरांची विधिवत पूजा केल्यानंतर ही अक्षरे श्री साई समाधी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या दरवाजावर लावण्यात आली असून ही सुवर्ण अक्षरे सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या दानाबद्दल संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर यांनी संबंधित साईभक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. सुवर्णाक्षरातील ‘ॐ साई राम’ हे नक्षीकामाने अलंकृत झालेले असून श्रद्धा, भक्ती आणि दानशीलतेचा संगम असलेले हे अक्षर भक्तांच्या हृदयाला भावणारे ठरत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी तेलंगणा राज्यातील साईभक्त डॉ. जी. हरिनाथ आणि श्रीमती जी. पुष्पलता यांनी श्री साईचरणी एकूण १७ लाख ७३ हजार ८३४ रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण केल्या. यामध्ये १९१.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट आणि २८३ ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड यांचा समावेश आहे. हे अगरबत्ती स्टँड अत्यंत आकर्षक आणि सुंदर नक्षीकामाने सजलेले असून त्यावर श्री साईबाबांची अमूल्य शिकवण असलेली ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ ही नावे सुंदर अक्षरांत लावली आहेत, त्यामुळे ते भक्तीचा आणि कलाकुसरीचा अद्वितीय संगम दिसत आहे.

कर्नाटक येथील साईभक्त व्यंकप्पा गणपती घोडके यांनी ४ लाख ७६ हजार ३६४ रुपये किमतीचे ५६.७१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे श्री साईचरणी अर्पण करून संस्थानच्या मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे यांच्याकडे सुपुर्द केले. संस्थानचे तत्कालीन संरक्षण अधिकारी आण्णासाहेब बन्सी परदेशी यांचा मुलगा व मुलगी दोघेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, या बहीणभावाला शासकीय सेवेत नोकरी मिळाल्यामुळे परदेशी यांनी साईचरणी ३६.२०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा त्रिशूळ अर्पण केला. त्यांची किंमत ३ लाख ३१ हजार ८४५ रुपये आहे.