सातारा : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वेळे (ता. वाई) गावाच्या हद्दीत पुणेकडून सातारा दिशेने येताना दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाली. तर पती गंभीर जखमी झाला. दुर्गा विजय जाधव (रा. उपळी, ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे, तर विजय महादेव जाधव हे जखमी आहेत. दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला अशी माहिती भुइंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी दिली.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय जाधव व त्यांच्या पत्नी दुर्गा हे दोघे दुचाकीवरून (एमएच ११ डीआर २३८७) साताऱ्याकडे येत होते. वेळे गावाच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या कंटेनरने दुचाकीला उडविले. यात दुचाकीवरून जाधव दांपत्य रस्त्यावर पडले. यामध्ये दुर्गा जाधव या जागीच ठार झाल्या. तर विजय जाधव गंभीर जखमी झाले. घटनास्थळी मदतकार्य करणाऱ्यांनी त्यांना त्वरित कवठे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. या अपघातातील कंटेनर चालक अनिलकुमार किशोरलाल यादव (रा. उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस हवालदार शिवाजीराव जाधव करीत आहेत.
फलटण तालुक्यात एकाचा खून
फलटण तालुक्यात एकाचा अज्ञाताने निर्घृण खून केल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी दिली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ११ रोजी फलटण पोलिसांना फलटण तालुक्यातील ठाकूरकी येथील पंधरकी नावाच्या शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मिळून आला होता. याच दरम्यान सोनाली संदीप रिटे ( ठाकूरकी, ता. फलटण) यांनी त्यांचे पती संदीप मनोहर शिंदे हे हरवल्याबाबतची तक्रार देण्यास फलटण शहर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना संबंधित बेवारस मृतदेह दाखवला असता त्यांनी तो मृतदेह त्यांचे पती संदीप रिटे यांचाच असल्याचे ओळखले. संदीप रिटे यांच्या शरीरावर खोलवर जखमा होऊन रक्तस्त्राव झाल्याचे दिसून येत असून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रिटे यांचा निर्घृणपणे खून केल्याचे समोर आले आहे. याबाबत अज्ञाता विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.