रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज(शनिवार) हिंदुत्वाच्या मुद्य्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केले.

सदाभाऊ खोत म्हणाले, “मुख्यमंत्री हे कर्तबगार असल्यामुळे जनता या महामारीशी या जनतेला वेळेत उपचार मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हते आणि हे मात्र पिंजऱ्यात बसून डरकाळ्या फोडत होते. मला वाटतं की जसं तुम लढो हम कपडे संभालते है…तसं कार्यकर्त्यांना सांगायचं की तुम्ही लढा, स्वत:वर गुन्हे दाखल करून घ्या आणि मी मात्र ऐश्वर्यामध्ये सत्ता उपभोगण्याचं काम करतो. केवळ मी एकटाच नाही तर माझ्या घरादारासकट मंत्री मंडळात घेऊन, आम्ही तुपाशी आणि तुम्हा रहा उपाशी अशी त्यांची एकंदरीत कृती आहे.”

तसेच, “दुसऱ्या बाजूला कडवं हिंदुत्व जे शिवसेनेने धारण केलेलं होतं. गर्व से कहो हम हिंदू है… ही घोषणा खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. ते ताठ मानेने सांगायचे की हा हिंदुस्थान हिंदूंचा. ते काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्टांवर तुटून पडायचे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांची भाषणं थोडी ऐकावीत. हिरवा शालू नेसलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सूर्योदय होण्या अगोदर लगेच त्यांच्या अंगावर भगवा शालू आला, ही दिव्य स्वप्न मुख्यमंत्र्यांना कशी काय पडली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही आता हिरवा शालू पांघरलेल्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहात, तुमचं हिंदुत्व आता नामोहरण झालेलं आहे.” असंही यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले.

याचबरोबर, “हिंदुत्व किंवा हिंदू धर्म ही एक आमची संस्कृती आहे. हिंदुत्वावर कोणाची मक्तेदारी नाही. परंतु ज्या मुशीतून राज ठाकरे घडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेलं ते रसायन आहे. हिंदुत्वाला फुंकर घालण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे, त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये कोणकोण भस्म होतं, हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल.”,असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राज ठाकरे यांचे कौतुके केले.