लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : किल्ले रायगडावर २० जून रोजी तिथीनुसार ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी हिंदवी स्वराज्याची राजधानी सजली आहे. राजसदरेवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले आहे.

जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. या घटनेला उद्या ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा शिवराज्याभिषेक सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून गडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>“तुम्हाला भेंडी बाजार सारखा…”, एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, “मतदारसंघात नाही पत अन् माझं नाव गणपत”

मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला, तसेच होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांची आरास करण्यात आला आहे, तर त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.गुरुवारी सकाळी होणाऱ्या मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, तर सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून स्थानिक आमदार भरत गोगावले काम पाहत आहेत.