जिल्हय़ातील सात वृत्तपत्रांत (‘लोकसत्ता’ नव्हे!) शनिवारी प्रसिद्ध झालेल्या बातम्या ‘पेड न्यूज’ असल्याचे प्राथमिक मत झाल्याने माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना पाच उमेदवारांना नोटिसा धाडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपचे श्रीगोंद्यातील उमेदवार बबनराव पाचपुते, नगरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप, पारनेरमधील अपक्ष उमेदवार माधवराव लामखडे, भाजपच्या कोपरगावच्या उमेदवार स्नेहलता बिपीन कोल्हे व शिवसेनेचे उमेदवार आशुतोष काळे या उमेदवारांना ४८ तासांत खुलासा मागवणाऱ्या नोटिसा धाडण्याचे आदेश आहेत.
तीनच दिवसांपूर्वी जिल्हय़ातील सात उमेदवारांच्या संबंधित बातम्या पेड न्यूज असल्याचे समितीचे प्राथमिक मत झाल्याने खुलासा मागवणाऱ्या नोटिसा धाडण्यात आल्या होत्या. या नोटिसांसाठी दिलेली मुदत उलटून गेली तरी अद्याप संबंधित उमेदवारांनी स्पष्टीकरण पाठवले नसल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
जिल्हय़ात सध्या उमेदवारांकडून पेड न्यूजचा धुमाकूळ सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचाराच्या बातम्या, एकाच आशयाच्या स्वरूपात, शब्दाचाही फरक न करता अनेक वृत्तपत्र (‘लोकसत्ता’ नव्हे!) प्रसिद्ध करत आहेत. अशा स्वरूपाच्या बातम्या पेड न्यूज असल्याचे समितीचे मत आहे. उमेदवारांकडून योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास समिती त्या बातमीला जाहिरात दर लागू करून ते शुल्क उमेदवाराच्या खर्चात जमा करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Oct 2014 रोजी प्रकाशित
एकाच दिवशी ७ वृत्तपत्रांत ‘पेड न्यूज’
जिल्हय़ातील सात वृत्तपत्रांत (‘लोकसत्ता’ नव्हे!) शनिवारी प्रसिद्ध झालेल्या बातम्या ‘पेड न्यूज’ असल्याचे...

First published on: 13-10-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the same day paid news in 7 papers