प्रसेनजीत इंगळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई तथा पालघर जिल्हा हा ऐतिहासिक वास्तूंचा खजिना म्हणून ओळखला जातो, दरवर्षी हजारो पर्यटक, अभ्यासक या वास्तू पाहण्यासाठी, संशोधनासाठी पालघर जिल्ह्यात येत असतात. पण मागील अनेक वर्षांपासून येथील हजारो वस्तू-वास्तू  पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेवटच्या घटका मोजत आहेत.

रामायण, महाभारत, बौद्ध, जैन, सातवाहन, गौतमीपुत्र , शतकर्णी, शिलाहार,  मुघल व पोर्तुगीज या काळातील शिलालेख, प्राचीन वस्तू, भांडी, मूर्त्यां, अवजारे, चित्र अशा अनेक वस्तूंचा खजिना वसईत काळाचा मारा सहन करत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  पुरातत्व विभागासह,  स्थानिक आस्थापना तथा राज्य वा केंद्र शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी केला आहे.

हजारोंपैकी केवळ १० ते १२ वास्तूंची नोंद

पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंची संख्या १००० हून अधिक आहे. यातील केवळ वसईचा किल्ला, अर्नाळा किल्ला, नालासोपारा बौद्ध स्तूप, डहाणूमधील काही लेण्या अशा केवळ १० ते १२ वास्तूंची नोंद पुरातत्व विभागाकडे आहे. अजूनही ५०० हून अधिक ठिकाणे आहेत ज्याचा शोधही घेतला गेला नाही. अनेक मूर्त्यां, शिलालेख, चोरी गेल्या आहेत. तर काही हवामान आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे नष्ट झाल्या आहेत.  आम्ही २००३ पासून शासनाकडे यासंदर्भात मागणी करत आहोत, पण आजतागयत कुणीही पुढाकर घेतला नसल्याची खंत त्यांनी  डॉ. श्रीदत्त, डॉ. राऊत यांनी व्यक्त केली. काही वर्षांपूर्वी वाडा येथून जंजिरे वसई किल्ल्यात आणलेल्या असंख्य मूर्ती अवशेष गोदामात पडून राहिलेल्या आहेत. यातीलच जंजिरे वसई किल्ल्यातील शिलाहारकालीन श्री गणेशाची मूर्ती. वसई सन २००७ साली किल्ले वसई मोहिमेचे अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी प्रकाशात आणली, पण केंद्रीय पुरातत्व विभागाकडून सदर बाबीवर अजूनही विशेष लक्ष देण्यात आलेले नाही. विरार-अर्नाळा येथे अर्नाळा-वसई  मराठा आरमाराचे पहिले सुभेदार बाजीराव बेलोसे यांच्या  समाधीची साधी नोंदणीही पुरातत्व विभागाकडे नाही. समाधीवर  झाडे उगवली असून समाधीची इमारत दुभंगली आहे. वसई किरवली येथील तलावात २०१२  साली ७६० वर्षांपूर्वीचा एक शिलालेख सापडला होता. हा शिलालेख इसवी सन १२६८ मधील शिलाहार साम्राज्याच्या काळातील असल्याचे इतिहासतज्ज्ञांनी सांगितले, पण आजतागायत हा शिलालेख तलावाच्या किनाऱ्यावर पडून आहे.नालासोपारा येथील बौद्ध स्तूपसुद्धा भग्नावस्थेत असून दरवर्षी पावसाळ्यात या स्तुपाचे मोठे नुकसान होते. तर वसईतील प्रमुख आकर्षण असलेले चर्चसुद्धा देखभालीविना आहे.  वसई किल्ल्यात पुरातत्व विभागाला प्राचीन २०१२ साली मातीचे घडे, भांडी, कोरीव काम केलेले दगड, तोफांचे गोळे, लोखंडी अवजारे आणि मानवी हाडे अशा अनेक वस्तू सापडल्या त्या वेळी मोठा गाजावाजा करत या ऐतिहासिक वस्तूंचे वैज्ञानिक  पद्धतीने जतन  करण्यात येईल असे सांगितले होते. पण आजतागायत त्या पडून आहेत.

ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भाबाबत मुंबई केंद्रीय पुरातत्व विभागास तिळमात्र जाणीव नाही. सतत पाठपुरावा करूनही लवकरच कारवाई करण्याचे केवळ आश्वासन दिले जाते.

– डॉ. श्रीदत्त राऊत : इतिहास अभ्यासक

आम्ही सरळ कोणत्याही वस्तू घेऊ शकत नाही.  वसईतील अनेक वस्तू, शिलालेख आणि इतर ऐतिहासिक वास्तू या खासगी मालकीत असल्याने अडचणी येत आहेत. आजतागायत ऐतिहासिक वस्तूंची कोणतीही पाहणी झाली नाही आणि त्यांची नोंदणीही झाली नाही.

– कैलाश शिंदे, संवर्धक सहायक वसई

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the way to erase the footsteps of the history of the palghar district abn
First published on: 26-12-2020 at 00:01 IST