अलिबाग : पूर्ववैमनस्यातून अलिबाग तालुक्यातील आवास येथे एका कुटूंबावर गुरुवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात हल्यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांची पाच जणांना अटक केली आहे.
आवास मध्ये राहणाऱ्या विवेक राणे आणि देवेंद्र म्हात्रे यांच्या कुटूंबात वाद होता. मात्र गुरुवारी रात्री कार पार्कींगच्या शुल्लक कारणावरून हा वाद विकोपाला गेला. पाऊस पडत असल्याने, विवेक राणे आणि त्यांचे कुटूंबिय कार शेड मध्ये पार्कींग करण्यासाठी गेले होते. यावेळी देवेंद्र म्हात्रे आणि त्यांचे कुटूंबातील इतर पाच जण जुन्या भांडणाचा राग धरून तलवारी आणि चाकू तिथे घेऊन आले. आणि विवेक राणे यांच्या कुटूंबावर सशस्त्र हल्ला चढवला. धर्मेद्र नंदकुमार राणे मृत्यू झाला. तर विवेक राणे, विश्वास राणे करूणा राणे गंभीर जखमी झाले. तिघांनाही अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अतिशय निघृणपणे चौघांवर चाकू सुऱ्यांनी वार करण्यात आले आहेत.
या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात आरोपी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकीत अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पुनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३, १०९, १२६,(२), ११८(१)३५२, ३५१(२)१९०, १९१सह भारतीय शस्त्र अधिनियमच्या विवीध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी सहा पैकी पाच आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान या घटनेमुळे आवास गावात खळबळ उडाली आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी गावात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.