सोलापूरचे प्रमोद गायकवाड प्रदेशाध्यक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात रिपब्लिकन पक्षाची अनेक शकले उडाली असताना त्यात आता आणखी एका गटाच्या पक्षाची भर पडली आहे. या नव्या पक्षाची स्थापना सोलापुरातील प्रमोद गायकवाड यांनी केली असून रिपाइं (पीजी गट) या नावाने हा पक्ष कार्यरत राहणार असून अर्थात प्रमोद गायकवाड हेच या उदयाला आलेल्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत.
माजी उपमहापौर असलेले गायकवाड यांनी गेल्या काही वर्षांत विविध राजकीय पक्षांची सफर केली आहे. दलित पँथरचे दिवंगत कार्यकत्रे संजय गायकवाड यांचे ते बंधू आहेत. २३ वर्षांपूर्वी बंधू संजय यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर प्रमोद गायकवाड हे राजकारणात सक्रिय झाले. सुरुवातीला रा. सु गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे गटानंतर ते रामदास आठवले यांच्या गटात आले. स्वत नगरसेवक झाले आणि नंतर पत्नी नूतन गायकवाड यांनाही महापालिकेत निवडून आणले. रिपाइं (आठवले गट) मध्ये असताना पालिकेत सत्ताधारी काँग्रेसबरोबरच्या आघाडीच्या जोरावर गायकवाड हे उपमहापौर झाले होते. त्यानंतर रिपाइं (आठवले) पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांनी थेट शिवसेनेचाही रस्ता पकडला होता. नंतर पुन्हा ते स्वगृही परतले खरे; परंतु त्यांचे महत्त्व वाढू शकले नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस ‘एकला चलो रे’ ची भूमिका वठविली आणि अखेर आता स्वत रिपाइं (पीजी गट) या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. या नव्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद त्यांनी स्वतकडे घेतले आहे. शहरात छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रुग्णालयाच्या मागे सिद्धार्थ चौक परिसरात गायकवाड यांचा दरारा आहे.
आता नव्या राजकीय पक्षाला जन्माला घातल्यानंतर राज्यात हा पक्ष नेणार की सोलापुरातच ते देखील मर्यादित स्वरूपात आपले अस्तित्व टिकविणार, यावर गायकवाड यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याचे आंबेडकरी समाजात मानले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more republican party in solapur
First published on: 19-11-2015 at 01:36 IST