सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच पिरवाडी या सातारा शहराच्या उपनगरात एका अपार्टमेंटमध्ये घरफोडी करण्यासाठी आलेल्या पुण्यातील चार चोरट्यांपैकी एकाचा गच्चीवरून पडून मृत्यू झाला. एकास रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्यांकडून सहा लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.
वेदांत शांताराम आरोडे (मंचर, पुणे) असे मृत्यू झालेल्या चोरट्याचे नाव आहे. साथीदार महेश दत्तात्रय मंगळवेढेकर याला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. चौघांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महामार्गालगत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिरवाडी या उपनगरात मध्यरात्री पुण्यातील चार चोरटे एका अपार्टमेंटमध्ये घरफोडी करण्यासाठी आले होते. यावेळी चोरट्यांनी दोन घरे फोडून त्यातील सहा लाखांचा ऐवज लांबवला. मात्र चोरी करताना त्यांनी इतर फ्लॅटधारकांच्या दरवाज्याला बाहेरून कड्या घातल्या होत्या. रहिवाशांना काहीतरी तोडफोड सुरू असल्याचा अंदाज आल्याने रहिवासी जागे झाले. मात्र त्यांच्या घरांना बाहेरून कडी असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते.
धाडस करून सुटीवर आलेले जवान वैभव जाधव यांच्या पत्नीने दरवाजा उघडला. यावेळी बाहेर उभा असणारा वेदांत आरोडे या चोरट्याने जाधव यांच्या डोक्यात कटावणीने घाव घातला. तो पळून टेरेसवर गेला. दुसरा चोरटा त्याच ठिकाणी उभा होता. यावेळी इतर स्थानिक जमा झाल्याने त्यांनी महेश मंगळवेढेकर याला पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत वेदांत आरोडे याने वैभव जाधव यांना तुला गोळी घालून मारतो थांब जरा असे म्हणत गच्चीवर पळून गेला. तिथून खाली उतरत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. महेश मंगळवेढेकर याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी दोन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या चोरट्यांकडून सहा तोळे सोन्याचा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघांवर घरफोडीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बाबुराव घार्गे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.