कल्याण-नगर रस्त्यावरील माळशेज घाटात पडलेली महाकाय शिळा फोडण्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले आले. मंगळवारी (३० जुलै) सायंकाळपर्यंत एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गेल्या बुधवारी (२४ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास डोंगराची कडा कोसळली. सुमारे ५० फुटाचा महाकाय दगड रस्त्यात कोसळल्यामुळे कल्याण-नगर रस्त्याची वाहतूक सेवा ठप्प झाली होती. राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी सलग पाच दिवस हा महाकाय दगड सुरूंगावाटे फोडण्यास सुरुवात केली होती. पाऊस, धुके व बघ्यांची गर्दी यामुळे दगड फोडण्यात वारंवार व्यत्यय येत होता, महाकाय दगड फोडण्याचे ७५ टक्के काम झाले आहे, मात्र महाकाय दगड कोसळल्याने तेथील भाग पूर्णपणे खचून गेल्याने तेथे भराव टाकून तूर्त तरी एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उपअभियंता प्रदीप दळवी यांनी दिली.
महाकाय दगडाखाली येऊन दोन जणांचा मृत्यू झाला, त्याचबरोबर टेम्पोचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. टेम्पोचा सांगाडा आज बाहेर काढण्यात आला.
डोंगराची कडा तुटून पडलेला हा महाकाय दगड मोठा अडथळा निर्माण झाला होता. काळा पाषाण असल्याने सुरूंग लावूनदेखील तो फोडणे जिकिरीचे काम होते, तरी देखील महामार्ग कर्मचाऱ्यांनी भर पावसात हा दगड फोडण्यात यश मिळविले. पाऊस व धुके कमी झाल्यास उद्या (दि. ३०) एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती दळवी यांनी दिली.
दरम्यान, पर्यटकांना केलेल्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षांविहारासाठी शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी हजारो पर्यटक या घाटात येतात, मात्र या दुर्घटनेनंतर अवघे ४०० ते ५०० पर्यटक या दोन्ही दिवशी आले. त्यामुळे प्रशासनाला काम करताना अडथळा निर्माण झाला नाही. मात्र, पर्यटक कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला.