पंढरपूर : येथील श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील पूजेची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात २८ जुलै रोजी सकाळी ११ पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

मंदिर समितीच्या १५ जून रोजीच्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४, दुसऱ्या टप्प्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ तसेच तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता चौथ्या टप्प्यात १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा व पाद्यपूजा तसेच १ ते ३१ ऑगस्ट २०२५ कालावधीतील तुळशी अर्चन पूजा व महानैवेद्य सहभाग योजना ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६ – २९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा. याशिवाय पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे, कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये, असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे २५,००० रुपये व ११,००० रुपये तसेच पाद्यपूजेसाठी ५००० रुपये व तुळशी अर्चन पूजेसाठी २१०० रुपये तसेच महानैवेद्य सहभाग योजनेसाठी ७००० रुपये इतके देणगी मूल्य आहे.