नुसत्या देवगड आणि रत्नागिरीचा हापूस या नावानेच नव्हे तर आता कोकणाबाहेर पिकलेल्या कुठल्याही आंब्याला यापुढे ‘हापूस’ नावाने ग्राहकांच्या माथी मारता येणार नाही. देवगड, रत्नागिरीप्रमाणे कोकण प्रदेशातील रायगड, पालघर, ठाणे आदी भागांत पिकविलेल्या ‘हापूस’ आंब्यालाच हे नाव वापरता येईल. कोकणाव्यतिरिक्त देशाच्या कुठल्याही परिसरात पिकविलेल्या आंब्याची यापुढे हापूस नावाने विक्री केल्यास तो विक्रेता कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतो.

देवगड, रत्नागिरी आणि इतर ठिकाणच्या ‘हापूस’मध्ये ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’वरून (भौगोलिक निर्देशन – जीआय) असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट’ यांनी गुरुवारी हा खुलासा केला. देवगड, रत्नागिरी या ठिकाणच्या हापूसला या कार्यालयाने त्या-त्या नावाने (देवगडचा हापूस, रत्नागिरीचा हापूस) विक्री करण्यास यापूर्वीच मान्यता दिली होती; परंतु देवगड, रत्नागिरी वगळता कोकणच्या इतरही भागांत हापूसचे उत्पादन होते. येथील उत्पादकांनी ‘हापूस’ या नावाने आपल्या आंब्याची विक्री करायची का, याबाबत संभ्रम होता. म्हणून येथील उत्पादक जीआय कार्यालयाकडे याचिका घेऊन आले होते. त्यावर निर्णय घेत कोकणात उत्पादित होणाऱ्या हापूसलाच यापुढे हे नाव वापरता येईल, असा खुलासा कार्यालयाने केला आहे. म्हणजे कर्नाटक किंवा देशाच्या इतर भागांतून आलेल्या आंब्याला यापुढे ‘हापूस’ हे नावदेखील वापरण्यावर निर्बंध आले आहेत. तसा वापर करून आंब्याची विक्री केल्यास संबंधित विक्रेत्याला कोकणातील हापूस उत्पादकांना कायद्याच्या कचाट्यात अडकविता येईल, असे रत्नागिरी हापूसच्या वतीने बाजू मांडणारे गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.

देवगड, रत्नागिरीच नव्हे तर कोकणाच्या विविध भागांत पिकणाऱ्या हापूसची चव, रंग, दर्जा देशातील इतर आंब्यांच्या तुलनेत वरचढ ठरतो. हापूसचा दर्जा केवळ त्याच्या कलमावर ठरत नाही, तर विशिष्ट मातीत, वातावरणाचाही तोपरिणाम असतो. किनारपट्टीवरील हवा, जांभ्या दगडाच्या कातळावरील बागांमध्ये तयार होणाऱ्या हापूस आंब्यालाच विशिष्ट चव आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातून उत्पादित होणाऱ्या तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून उत्पादित होणाऱ्या आंब्यांना स्वत:ची अशी वेगवेगळी खास चव असतेच; परंतु ‘हापूस’ या नावावर अनेक विक्रेते कोकणाबाहेरचा आंबा ग्राहकांना महागडय़ा दरांत विकत आहेत. ही एक प्रकारे ग्राहकांची फसवणूक आहे; परंतु आता कोकणातील ‘हापूस’ला बौद्धिक संपदा हक्क कायद्याअंतर्गत भौगोलिक निर्देशन (जीआय) लाभल्याने या आंब्याची ओळख जपण्यास मदत होणार आहे.

‘जीआय’ म्हणजे?
जीआय (जिऑग्राफिकल इंडिकेशन) म्हणजे भौगोलिक निर्देशन. याअंतर्गत एखाद्या भागातल्या कृषी उत्पादन आणि नैसर्गिक वस्तूंना त्याभागाची बौद्धिक संपदा असल्याचे शिक्कामोर्तब होते.