Raosaheb Danve on Uddhav Thackeray: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीवरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. शिवसेनेचे १२ खासदार संपर्कात असून येत्या काळात शिवसेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच उरतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्याल, असा प्रश्न विचारला असता रावसाहेब दानवे म्हणाले की, “उद्धव ठाकरे आमचे प्रिय मित्र होते, आता ते आमचे पूर्व मित्र आहेत. त्यामुळे त्यांना आमचा एकच सल्ला आहे. ज्या विचारांना तिलांजली देऊन त्यांनी जे सरकार स्थापन केलं होतं. ते सरकार त्यांच्या आमदारांना आणि राज्यातील जनतेला मान्य नव्हतं. त्यामुळे जे व्हायचं होतं, ते झालं आहे. आता त्यांनी शांततेनं राहावं. आमदार आणि खासदारांना बोलण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षात जी पिल्लावळ सोडली आहे. त्यांना त्यांनी थांबवावं. मुडदे परत येतील, गुवाहाटीला रेडे पाठवले, अशी वक्तव्य न शोभणारे आहेत. त्यामुळे त्यांनी ही भाषा बंद करून एक सरळमार्गी राजकारण करावं, असं माझं मत आहे,” असं दानवे म्हणाले.

हेही वाचा- “शिवसेना आमच्याच बापाची…” बंडखोर आमदारांवर संजय राऊतांची जोरदार टीका

राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेनं भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, असं पत्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि अन्य काही खासदारांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. याबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, “शिवसेनेचे १२ खासदार आमच्या संपर्कात आहेत. मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, यासाठी तीन-चार खासदारांनी उद्धव ठाकरेंना पत्र दिलं आहे. राहुल शेवाळे हे दादरमधून निवडून आले आहेत. या मागणीनंतर शिवसेनेनं भावना गवळी यांची हकालपट्टी केली आहे. ही नावं उघड झाली म्हणून मी सांगतोय, बाकी नावं सांगत नाही,” असंही दानवे यावेळी म्हणाले.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण…”, बच्चू कडूंनी व्यक्त केली खंत; मंत्रीपदाबाबतही स्पष्ट केली भूमिका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांवर टीका करताना दानवे म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील एक-एक माणूस वेचून एवढी मोठी शिवसेना उभी केली आहे. त्या शिवसेनेचे तुकडे-तुकडे करण्यात संजय राऊतांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे आता तरी स्वत:ला सावरा, वाक्य जपून वापरा, जी शिवसेना तुमच्या हातात उरली आहे, त्यांना तरी फुटू देऊ नका. शिवसेनेत आता केवळ दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत. ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे,” असा खळबळजनक दावाही दानवे यांनी यावेळी केला.