इतिहासकालीन अहमदनगर शहराचा वारसा जतन करण्यासाठी दारूल उलुम संस्थेच्या वतीने संग्रहालयाची स्थापना करण्यात आली असून, ‘आलमगीर म्युझियम’चे उद्घाटन, शहराच्या ५२४व्या स्थापनादिनी, उद्या (बुधवारी) आलमगीर येथे होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष शेख शकुर अजिज यांनी ही माहिती दिली. संग्रहालयाचे उद्घाटन मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती महमद इस्माईल यांच्या हस्ते व औरंगाबादच्या मौलाना आजाद कॉलेजच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. मिर्जा खिजर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास लेखक डॉ. मिर्जा अस्लम बेग, डॉ. मौलाना सदरूल हसन नदवी मदनी, पत्रकार भूषण देशमुख, प्रा. अ‍ॅड. इक्बाल काजी आदींच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता शहराजवळील आलमगीर येथील ऐतिहासिक वास्तूत होणार आहे.
पाचशे वर्षांचा इतिहास असणा-या नगर शहराची तुलना एकेकाळी बगदाद व तेहरानसारख्या समृद्ध शहराशी होत होती. मोगल व निजाम अशा दोन राजवटी येथे होत्या, त्यामुळे शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा आहे. शहराचा लुप्त होणारा इतिहास संग्रहालयातून जतन केला जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
शहरात फारसी, उर्दू व अरबी संस्कृतीचा मोठा वारसा आहे. तो युवा पिढीला माहिती करून देण्याचा उद्देश आहे. संग्रहालयात अरबी, फारसी भाषेतील हस्तलिखिते, नाणी, शस्त्रे, भांडी, युद्धसाहित्य ठेवले जाणार आहे. शहरातील निजामकालीन वास्तूंची एक शॉर्टफिल्मही तयार करण्यात आली असून ती संग्रहालयास भेट देणा-यांना दाखवली जाणार आहे. नागरिकांनी आपल्याकडील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास दान द्याव्यात, त्या योग्यप्रकारे जतन केल्या जातील असे आवाहन शेख यांनी केले आहे.
संग्रहालयातील प्रवेश विनामूल्य राहील व पाहण्यासाठी शुक्रवार वगळता सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ५ अशी वेळ राहील.