सांगली : दसऱ्यानिमित्त कवठेएकंद (ता.तासगाव) येथे उद्या, गुरुवारी होणाऱ्या आतषबाजीमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’, परकीय ड्रोन हे नेस्तनाबूत करणारे ‘सुदर्शन एस २००’ ही प्रमुख आकर्षण आहेत. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या दारूच्या स्फोटानंतर प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या झाडाझडतीमध्ये विनापरवाना करण्यात आलेला साडेचार लाखांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला.
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे रविवारी झालेल्या स्फोटाच्या भीषण घटनेनंतर तासगाव पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत गावात छापेमारी केली. यावेळी सुदाम बाळासो पावसे (वय ५३, रा. अंबाबाई मंदिरजवळ, कवठेएकंद) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ लाख ४५ हजार रुपये किमतीचा दारुसाठा पोलिसांनी पकडला. बेकायदा व विनापरवाना दारूसाठ्यांची तपासणी करत कच्चा माल पाणी ओतून नष्ट केला, तर लाकडी शिंगटे ताब्यात घेण्यात आली.
कवठेएकंद येथे रविवारी अवैध व विनापरवाना शोभेची दारू तयार करताना झालेल्या स्फोटात आठ जण जखमी झाले. या जखमींवर विविध रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर महसूल व पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, उद्या, गुरुवारी विजयादशमी दिवशी गावात शोभेच्या दारूची आतषबाजी परंपरेप्रमाणे करण्यात येणार आहे. ग्रामदैवत बिऱ्हाडसिध्द यांच्या पालखीसमोर दारूची आतषबाजी करण्याची गेल्या तीन शतकांची परंपरा असल्याचे गावकरी सांगतात. सिध्दराज व बिरोबा देवाच्या दोन पालख्या सोने पूजन करून आपटा चौकातून निघाल्यानंतर पालखीसमोर दारूकामाची आतषबाजी करण्याची गेल्या तीन शतकांची परंपरा असल्याचा दावा गावकरी करत आहेत. यामुळे या प्रथेवर नियंत्रण आणणे प्रशासनालाही कठीण झाले आहे.
उद्या होणाऱ्या आतषबाजीची तयारी सुरू असून कवठेएकंद व नागाव कवठे या दोन जुळ्या गावांमध्ये ११३ हून अधिक दारू शोभा मंडळाकडून आतषबाजी केली जाणार आहे. यंदाच्या आतषबाजीमध्ये भारतीय सैनिकांनी पाकिस्तान विरुध्द राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरवर लक्ष्यवेधी देखावा आकाशात प्रदर्शित करण्याची तयारी एका मंडळाने केली आहे, तर पाकिस्तानचे ड्रोन हे अवकाशातच नष्ट करणाऱ्या सुदर्शन-२०० या विशेष प्रयोगाचे सादरीकरणही आतषबाजीमध्ये करण्यात येणार आहे.
ए-वन युवा मंच, ‘ईगल फायर वर्क्स’च्यावतीने हा देखावा आकाशात दाखविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. चावडीसमोर पालखी आल्यानंतर ८० हून अधिक लाकडी शिंगटे शिलगावली जाणार आहेत. अत्यंत ज्वलनशील दारूकाम होत असल्याने प्रशासनानेही खबरदारी घेतली असून अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, उपचारासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात येत आहे.