आजवर स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभाराचे गोडवे गाणाऱ्या विरोधकांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा पवित्रा घेतल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. चार राज्यातील निवडणूक निकालांच्या पाश्र्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल करण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
स्वत:ची स्वच्छ प्रतिमा जपण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभारवर पांघरूण घालण्याचे काम केले असून सध्या ते कलियुगातील धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यामुळे चव्हाणांची स्वपक्षीय आणि विरोधकांकडून कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात
आहे.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून पृथ्वीराज चव्हाण सातत्याने आपली स्वच्छ प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवेसेना-भाजप युती आणि त्यांच्या सहकारी पक्षांकडूनही चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेचे गोडवे गात राष्ट्रवादीलाच लक्ष्य केले जात असे. मात्र चार राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर भाजपा-शिवसेनेने भूमिका बदलली. आता मुख्यमंत्र्यावरच थेट हल्लाबोल करण्याचा निर्णय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
आजवर राष्ट्रवादी काँग्रेसलाच लक्ष्य केल्याचा मुख्यमंत्री आणि पर्यायाने काँग्रेसलाच लाभ होत होता. यायाच फायदा घेत मुख्यमंत्र्यानी गेल्या तीन वर्षांत काही चुकीचे निर्णय घेतले, असा सूर या बैठकीत उमटला. आता मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचे वाभाडे काढायचे आणि राष्ट्रवादीलाही झोडपायचे, अशी तयारी विरोधकांनी सुरू केली असून काही वादग्रस्त निर्णयांचा व काही प्रकरणांचा अधिवेशनात भांडाफोड करण्यासाठी कंबर कसली आहे.
 विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेना गटनेते सुभाष देसाई, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनीही या अधिवेशनात मुख्यंत्रीच विरोधकांच्या रडारवर असतील असे स्पष्ट संकेत दिले. सिंचन घोटाळा,आदर्श घोटाळ्याचा अहवाल असे अनेक अहवाल सरकारने दडपून ठेवले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह आजी माजी ११ मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले असून गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्यावर खटला भरण्यास सरकार परवानगी देत नाही. स्वत:ची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांना मात्र भ्रष्टाचारासाठी रान मोकळे सोडल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी
केला. गेल्या तीन वर्षांत राज्यातील भ्रष्टाचाराची ७२ प्रकरणे पुराव्यानिशी मुख्यमंत्र्यांना देऊनही त्यावर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखविलेले नाही, त्यामुळे तेच भ्रष्टाचाराला पाठिशी घालत आहेत, असा आरोपही खडसे यांनी केला, तर चव्हाण हे कलियुगातील धृतराष्ट्राच्या भूमिकेत वावरत असून केवळ भ्रष्टाचार दडपण्याचेच काम करीत आहेत, असे विनोद तावडे म्हणाले.