विधानसभेत अर्वाच्य शिवी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चालू अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले. सत्ताधारी पक्षाने निलंबनाचे हत्यार उपसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा निषेध करीत शुक्रवारी कामकाजावर बहिष्कार टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण अधिवेशनावरच बहिष्कार टाकला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले, तर काँग्रेस सोमवारपासून कामकाजात सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उभे राहिल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याची जयंती पनवेलला साजरी करण्यात आल्याचा उल्लेख केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई करण्यात येईल, असे सांगितले; पण विरोधी पक्षाचे सदस्य पुढे आल्याने गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता तावातावाने बोलत होते. मुख्यमंत्री बोलण्यासाठी उभे राहिल्यावर सर्वानी शांत राहायला हवे. आम्ही विरोधी पक्षात असताना तसे करीत होतो, असे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांची व विरोधकांची बोलाचाली सुरू झाली. त्या वेळी आव्हाड यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याने सभागृहात गोंधळ झाला. सत्ताधारी पक्षाचे आमदार अध्यक्षांपुढील जागेत आले व आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. त्या वेळी घोषणाबाजी झाली. सभागृहाचे कामकाज या गोंधळात तीन वेळा तहकूब करावे लागले. आव्हाड यांच्यावर कारवाईचा आग्रह धरला गेल्याने त्यांना चालू अधिवेशन काळात निलंबित करण्याचा प्रस्ताव विधिमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी मांडला. तो आवाजी बहुमताने संमत करण्यात आला.
त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आक्षेप घेतला. आव्हाड यांनी जो अनुचित शब्द वापरला, त्याहून अधिक तीव्र शब्द एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षात असताना वापरले आहेत. बहुमताच्या आधारावर निलंबनाची कारवाई करू नये, अशी सूचना त्यांनी केली; पण निलंबन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले.
काँग्रेसचेही पाच आमदार निलंबित असून आमचा बहिष्कार नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाविरोधात होता. आम्ही निलंबनाविरुद्धच्या बहिष्कारात सामील होणार नसून सोमवारी कामकाजात सहभागी होणार असल्याचे विखेपाटील यांनी सांगितले.