P. L. Deshpande महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राचा नियम लागू केल्यानंतर हिंदी सक्ती आम्ही सहन करणार नाही अशी गर्जना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केली. राज्य सरकारने हिंदी ऐवजी तिसरी भाषा म्हणून कुठलीही शिकू शकता असाही पर्याय दिला होता. मात्र सरकारला हे दोन्ही निर्णय मागे घ्यावे लागले. यानंतर ठाकरे बंधूंनी म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत एक विजयी मेळावा ५ जुलै रोजी घेतला. हिंदी सक्तीला विरोध कसा आहे ते या दोघांनीही सांगितलं. दरम्यान आता महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या पु. ल. देशपांडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठी बाबत पु.ल. देशपांडे यांनी त्यांच्या भावना त्यांच्या खास शैलीत व्यक्त केल्या होत्या.
मराठी भाषेबाबत काय म्हणाले होते पु. ल. देशपांडे?
“आपण सगळे मराठी नावाच्या भावनेने एकत्र जमलो आहोत. ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं त्यालाच दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येतं, असंच मला वाटतं. आपल्या आईवर जो प्रेम करतो त्याला मातृत्व म्हणजे काय, वात्सल्य म्हणजे काय ते समजतं. तसंच आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं जगातल्या सर्व भाषांवर प्रेम करतात. त्याचा दुस्वास कुणीही करत नाही. भाषेचा दुस्वास कसला करायचा? दुस्वास ही एक निराळीच भावना आहे.”
थोर माणसांनी जी भाषा समृद्ध केली त्यातलेच आपण लहानसे आहोत-पु.ल. देशपांडे
“अभिमानाने आपण म्हणतो की हो मी मराठी आहे. मला नेहमी मराठी आहे असं वाटतं की शिवाजी महाराज सुद्धा सोयराबाईंना आजचं पिठलं काही जमलं नाही बरं का.. वगैरे मराठीत सांगत असतील. ही कल्पना मला खूप बरी वाटते. अशा थोर माणसांनी जी भाषा समृद्ध केली त्यातलेच आपण एक लहानसे आहोत असंच मला वाटतं.” असं पु. ल. देशपांडे यांनी जागतिक मराठी परिषदेत केलेल्या भाषणात म्हटलं होतं. १९८९ मध्ये हा कार्यक्रम पार पडला होता. या भाषणात मराठी बाबत त्यांनी व्यक्त केलेलं प्रेम आणि त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
पु.ल. देशपांडे यांनी केलेल्या भाषणाच्या या क्लिप्स सध्याच्या घडीला व्हायरल होत आहेत. निखळ विनोद निर्मिती कशी करायची हे ज्या पुलंनी महाराष्ट्राला शिकवलं त्यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत मराठीभाषेबाबत त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. युट्यूब, एक्स तसंच इन्स्टाग्रामवर या भाषणाच्या क्लीप्स अनेकदा व्हायरल होत असतात. सध्या मराठी भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे त्यानंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.