गुहागर : तालुक्यातील पाचेरी हे दिसायला कोकणातल्या इतर गावांसारखंच… शाळांमध्ये भांडताना किंवा चावडीवर गप्पा मारताना शिव्यांचा वापर ही सहज कृती इथंही घडतच असणार… मात्र आता गावामध्ये कुणीही शिवी दिली, तर त्याला चक्क ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. गावानं एकमुखानं तसा ठरावच केलाय….

झालंय असं, की आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पाचेरीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. चक्रभेदी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारानं जिल्हा परिषदेच्या शाळेत महिला सभा झाली. सभेत यशदाच्या प्रशिक्षक वैदेही सावंत यांनी विविध समस्यांवर महिलांना बोलतं केलं. गावातील तरुण शहरांकडे जात असल्याकडे काही जणींनी लक्ष वेधलं, तर विधवा अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत असाही मतप्रवाह समोर आला.

गावात बाहेरून तज्ज्ञ डॉक्टर यावेत, शैक्षणिक सहली काढाव्यात, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावं अशा अनेक सूचना समोर आल्या. यावर मार्ग काढण्याचं निश्चित झालं खरं, मात्र गावात दिल्या जाणाऱ्या शिव्या ही चिंतेची बाब असल्याचा मुद्दा काही महिलांनी मांडला. विशेषत: आई किंवा बहिणीवरून सर्रास दिल्या जाणाऱ्या शिव्यांमुळे महिलांचा अपमान होत असल्याचे काही जणांनी अधोरेखित केले. त्यानंतर गावात कुणीही शिवी देऊ नये आणि दिल्यास त्याला ५०० रुपयांचा दंड आकारला जावा, असा ठराव करण्यात आला आणि तो गावचे प्रशासक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्या पाठिंब्यासह एकमतानं मंजूर झाला. आता या गावाचा आदर्श समोर ठेवून केवळ कोकणच नव्हे, तर राज्यातील प्रत्येक गाव शिवीमुक्त व्हावं, अशी अपेक्षा चक्रभेदी फाऊंडेशनकडून व्यक्त करण्यात आली.

अपमान टाळण्यासाठी…

●खरं तर आपल्या भावनांना मोकळी वाट मिळते, असं सांगत काही जण शिव्या देण्याचं समर्थन करतात.

●मात्र यामुळे समोरच्याचा पाणउतारा होतोच, शिवाय अनेकदा महिलांचाही अनाहुतपणे अपमान केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●हे टाळायचं असेल, तर शिवीमुक्त गाव ही संकल्पना अमलात आणली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.