अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत दहा किलो चरसची पाकिटे आढळून आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी ती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या ताब्यात दिली.

गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. स्वच्छता मोहीम सुरू असताना समुद्रकिनारी असणाऱ्या कचऱ्यात एक छोटी गोणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या नजरेस पडली. ही गोणी त्यांनी कचऱ्यातून बाहेर काढली असता, त्यामध्ये अफगान प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे दिसून आली. मागील काही दिवसांत रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारी अशी पाकिटे सापडली होती. त्यामध्ये चरस हा अमली पदार्थ असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. ही बाब लक्षात घेत डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासोबत संपर्क साधत घटनेची माहिती दिली.

हेही वाचा – “आदू बाळानं सरकारला सळो की पळो करून सोडलं”, भाजपाच्या ‘त्या’ टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

हेही वाचा – “ती वाघनखं शिवाजी महाराजांची असूच शकत नाहीत”, वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर पाकिटे चरसची असल्याचे स्पष्ट करीत तातडीने पंचनामा करून परिसरात शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या महिन्याभरात रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांच्या पिशव्या वाहून येण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जिल्ह्यात अलिबाग आणि श्रीवर्धन तालुक्यातील ठिकठिकाणीच्या समुद्रकिनाऱ्यावर २०० हून अधिक चरसची पाकिटे आढळून आली आहेत. ज्याची बाजारातील किंमत साडेआठ कोटींहून अधिक आहे. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान अलिबाग पोलिसांनी पंचनामा करीत सदर पाकिटे जप्त केली आहेत.