कराड : गावोगावच्या तरुणांनो शिक्षणानंतर शहरांकडे न वळता, गावातच ग्रामीण उद्योगधंदे, शेती अन् शिक्षणातून आत्मनिर्भर व्हा, असे आवाहन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदिवासी समाजाचे मार्गदर्शक चैत्राम पवार यांनी केले. तुमची हीच खरी ताकद असून, गावाचे भविष्य घडवायचे असल्यास गाव न सोडता, गावातच राहून ते समृद्ध करणे गरजेचे असल्याचेही पवार या वेळी म्हणाले.जनजाती कल्याण आश्रम, कराड शाखेतर्फे आण्णा भोई स्मृतिसदनात मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. आश्रम शाखाध्यक्ष डॉ. अंजनीताई शाह यांची उपस्थिती होती.
चैत्राम पवार म्हणाले, ग्रामविकास स्थानिकांनीच करायचा असतो; जल, जंगल, जमीन, जन अन् जनावर या नैसर्गिक पंचसूत्रातूनच खरा ग्रामविकास होऊ शकतो, त्यामुळे गाव सोडून शहरांकडे धाव घेण्यात काही अर्थ नाही. गावातील साधनसंपत्ती, निसर्गाची देणगी आणि सामूहिक श्रम यांच्या बळावरच टिकाऊ विकास शक्य आहे. हे पटवून दिल्याने समाजाचा विचार बदलला आणि त्यातून ‘बारीपाडा’सारख्या आदिवासी गावाचा शाश्वत विकास झाला. स्वाभिमानी, स्वावलंबी समाज बनला. पाण्याची योग्य साठवणूक, जंगलांची काळजी, जमिनीची सुपीकता, लोकसहभाग, जनावरांचे संवर्धन या पंचसूत्रांतून बारीपाडा आदर्श ठरल्याचे त्यांनी सांगितले.
बारीपाड्यातील उपक्रमांचा आढावा घेताना ते म्हणाले, जलटंचाईवर मात करण्यासाठी शेकडो बांधबंधारे उभारणे, समतल चर काढणे, जंगल संवर्धनात ग्रामस्थांचा सहभाग, गो-पालन, सेंद्रिय शेतीचा पुरस्कार, स्थानिक पीकपद्धती आणि त्यातून अर्थप्राप्ती, वृक्ष संवर्धन, कुऱ्हाड बंदी, चुकार शिक्षक व मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंड, सौर कुकर उपलब्धी, बचत गटाची स्थापना, १,८०० हेक्टरमध्ये जंगल निर्मिती, अभ्यास सहली, ग्रामसभेतून लोकशाही निर्णयप्रक्रिया आणि जनावरांच्या आरोग्य, संवर्धनाकडे विशेष लक्ष आदी अनेक उपक्रमांनी बारीपाड्याला ‘नंदनवन’ बनविल्याचे चैत्राम पवार यांनी सांगितले. बारीपाड्यासह लगतच्या ४४ गावांत हे कार्य सुरू असून, १,२०० हेक्टर क्षेत्र विकसित केले आहे. त्यासाठी जनजाती कल्याण आश्रमाची प्रेरणा, साथ मोलाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.
ही यशोगाथा सांगितल्यावर पवार म्हणाले, की गावोगावच्या तरुणांनो शिक्षणानंतर शहरांकडे न वळता, गावातच ग्रामीण उद्योगधंदे, शेती अन् शिक्षणातून आत्मनिर्भर व्हा. तुमची हीच खरी ताकद असून, गावाचे भविष्य घडवायचे असल्यास गाव न सोडता, गावातच राहून ते समृद्ध करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात डॉ. अंजनीताई शाह यांनी मागासलेल्या आदिवासी पाड्याला आदर्श गावपाडा बनवून जगाच्या नकाशावर झळकवण्याची किमया चैत्राम पवार यांनी साधल्याचे सांगितले. कार्यक्रमात श्रोत्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे चैत्राम पवार यांनी दिली.