|| मंदार लोहोकरे
पंढरपूर तालुक्यातील महिलेचे यश
लोणची, पापड असले उन्हाळी पदार्थ तयार करणे असेल किंवा पिठाची गिरणी, ब्युटी पार्लर वा शिलाईकाम सारखे व्यवसाय चालवण्यात अडकलेल्या बचतगट किंवा त्यांच्या सदस्यांनीही आता आपली पावले विस्तारण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील रमाई मागसवर्गीय बचत गटाच्या छाया वायदंडे यांनी हीच नवी वाट चोखाळत वैशिष्टय़पूर्ण पगडय़ा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज पंढरपूरसारख्या तालुक्यातून तो नावारूपालाही आणला. केवळ मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या कुटुंबाला आज एक व्यावसायिक अशी ओ़ळख मिळाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील वायदंडे यांचे कुटुंब मोलमजुरीवर कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. पतीच्या या अर्थाजनात मदत करण्याच्या हेतूने छाया वायदंडे यांचीदेखील खटपट सुरू होती. अखेरीस त्यांना माहेरी असलेल्या पगडी बनविण्याच्या व्यवसायाचा आधार वाटला आणि त्यांनी त्यात उडी घेतली. सुरूवातीला त्यांनी या पगडय़ा बनवण्याची कला शिकून घेतली. पण केवळ पगडी तयार करता येऊन भागणार नव्हते, तर त्याला बाजारपेठ उपलब्ध होईल का याचाही अंदाज येणे आवश्यक होते. जर वस्तू बनविल्या आणि त्या विकल्याच गेल्या नाहीतर अडचणीत येण्याचीच भीती होती. पण अखेरीस भावाच्या मदतीने त्यांनी निवडक संख्येने घरच्याघरी पगडय़ा बनवण्यास सुरूवात केली. यासाठी लागणारे साहित्य आणि विक्रीसाठी भावाची मदत होऊ लागली. पुढे निर्मिती आणि बाजारपेठेचा अंदाज आल्यावर वायदंडे यांनी येथील पंचायत समितीच्या माध्यमातून या व्यवसायासाठी १० हजार रुपयांचे कर्ज काढले आणि पूर्णवेळ या व्यवसायात उतरल्या. पुढे पगडय़ा बनू लागल्या आणि हळूहळू त्याला मागणीही वाढू लागली. यातूनच मग त्यांना या व्यवसायाच्या विस्ताराची गरज वाटली. या वेळी त्यांचा बचतगट मदतीला धावला. या कर्जातून त्यांनी उत्पादन आणि त्यातील वैविध्य दोन्हीही वाढवले. सुरुवातीला त्या केवळ पुणेरी आणि तुकाराम महाराज यांचीच पगडी बनवत, पण आता त्यांच्या या कलानिर्मितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा टोप, मावळी पगडी, श्री विठ्ठलाचा टोप, एवढेच नाही तर आदिलशाही ,निजामशाही यांच्या काळातील पगडय़ा यांचीही भर पडत गेली आणि पगडीवाल्या व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख तयार होऊ लागली. पगडी बनवण्याच्या कामी त्यांना पती आणि मुलेही मदत करतात. त्यांनी बनविलेल्या वस्तूंना पंढरपूर, सोलापूर, जेजुरी, पुण्याच्या बाजारपेठेत आता मागणी येऊ लागली आहे. ग्रामीण भागातील एका महिलेने निर्माण केलेला, वाढवलेला हा आगळावेगळा व्यवसाय, त्यात मिळवलेले यश सध्या इथे कौतुकाचा विषय बनले आहे.
माहेरच्या कलेने आधार दिला
माझे पती हे मोलमजुरी करत होते. त्या जोडीला आपणही हातभार लावू असा विचार आला. माहेरी करीत असलेला पगडी व्यवसायास सुरुवात केली. घरचे काम संपल्यावर फावल्या वेळेत हे काम करता करता एक नवा व्यवसायच सापडला. कधीकाळी केवळ मोलमजुरीवर चरितार्थ चालवणारे आमचे कुटुंब आज व्यावसायिक झाले आहे. – छाया वायदंडे