गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात सुरू असलेल्या भूमाफियांच्या दादागिरीविरोधात स्थानिक गावकऱ्यांनी आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी मंगळवारपासून पाचगणी बेमुदत काळासाठी बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या आंदोलनात पाचगणीसह दांडेघर ,गोडवली ,आंबा , खिगर, राजपुरी, ताईघाट, भिलार, भोसे, काळवंड, पांगारी, दानवली, गुरेघर, अवकाळी, मेटगुताड आदी गावांतील ग्रामस्थही सहभागी होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षांत महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात भूमाफियांकडून दहशत दाखवून जमिनी बळकावण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. राजकीय पाठबळ आणि सरकारी अधिकाऱ्यांशी असलेले संगनमत याच्या जोरावर या माफियांनी आजवर अनेक खासगी मालमत्ता व देवस्थानांच्या जमिनी बळकावल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून भूमाफियांकडून परस्पर जमिनीशी संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार केले जात. त्यानंतर शासनाच्या नियमाचा आधार घेत भूमाफियांकडून संबंधित जमिनीवर दावा सांगितला जात असे. अनेक वर्षे हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. मात्र, या भूमाफियांना असणाऱ्या राजकीय पाठबळामुळे स्थानिक गावकरी या विरोधात आवाज उठवण्यास कचरत होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी दांडेघरमधील केदारेश्‍वर देवस्थानाची जमीन भूमाफियांकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यानंतर याविरोधात जनमत एकवटायला सुरूवात झाली होती. या देवस्थानाच्या परिसरात प्रांताधिकार्‍यांचे आदेश असतानाही तिर्‍हाईत व्यक्तीने या ठिकाणी बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू केले होते. ग्रामस्थांनी याला अटकाव केल्यानंतर ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत महसुल विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. प्रशासकीय पातळीवर ग्रामस्थांची कोणत्याही प्रकारची दखल न घेता उलटपक्षी पोलिस व महसूल प्रशासन प्रतिवादीला सहकार्य करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याच्या निषेधार्थ दांडेघर ग्रामस्थांकडून पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढण्यात आला होता. त्याचीच परिणिती आता पाचगणी बंद आंदोलनात झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchgani band andolan total shut down protest against land mafia
First published on: 08-10-2017 at 22:39 IST