Pandharpur Ashadhi Wari 2023: गेल्या महिन्याभरापासून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेला वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला आणि अवघी पंढरी विठ्ठल-रखुमाईच्या नावाने दुमदुमून गेली. आपल्या विठ्ठलाच्या भेटीनं वारकऱ्यांचं मन तृप्त झालं, पायी निघालेल्या वारकऱ्यांचे कष्ट लाडक्या विठुरायाच्या दर्शनानं कुठल्याकुठे पळून गेले. लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. या भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या पंढरपूरच्या मंदिरात पहाटे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली.

राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील जनता सुखी समाधानी आणि आनंदी रहावी हीच मागणी विठुरायाच्या चरणी मागितल्याचे त्यांनी सांगितले.

“विरोधकांच्या टीकेला मी कामातून उत्तर देईन”

“मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या हातून जेवढं सर्वसामान्य लोकांचं काम होईल, राज्याच्या विकासाचं काम होईल हाच माझा आणि आमच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न आहे. विरोधकांकडे विरोध आणि आरोप याशिवाय दुसरं काहीच नाहीये. आरोप आणि टोमणे. त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल. महाराष्ट्रातली जनता सूज्ञ आहे. काम करणारे लोक कोण आहेत, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर दिलं.

Ashadhi Wari 2023: पंढरपूर वारीची प्राचीन परंपरा आणि संलग्न आख्यायिका 

“सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास”

पंढरपूर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदीरातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तसेच पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी तर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १०८ कोटी रुपये मंजूर केल्याचे यावेळी जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहमदनगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान!

“देवगड संस्थानच्या भास्करजी महाराजांच्या प्रेरणेनं आम्हाला आज आह मान मिळाला. ही पांडुरंगाचीच कृपा आहे. गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळ आम्ही वारी करत आहोत. यावेळी मी गाडीनं आलो. आम्हाला दर्शनासाठी ८ तास लागले”, अशी प्रतिक्रिया यावेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान मिळालेल्या काळे दाम्पत्यानं दिली. ५६ वर्षीय भाऊसाहेब काळे व त्यांच्या ५२ वर्षीय पत्नी मंगल काळे यांनी तब्बल १८ तास रांगेत थांबल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.