पंढरपूर : सीना नदीचा पूर थांबतोय ना थांबतोय, तोच आता भीमा नदी आणि दुष्काळी माण नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भीमा अर्थात चंद्रभागा नदीत उजनी धरणातून दुपारी ४ वाजता १ लाख २५ हजार क्युसेक, तर वीर धरणातून ७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सांगोला येथील माण नदी दुथडी भरून वाहत असून, म्हसवड येथील राजेवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू अाहे. येथेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, सीना नदीकाठच्या २९ गावांत अद्याप पाणी आहे. मात्र, धोका टळला असला, तरी प्रशासन सतर्क आहे.
सोलापूर जिल्ह्यात पावसापाठोपाठ आता नदीला पुराचे संकट घोंगावत आहे. सीना नदीत लगतच्या जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. तसेच पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, अहिल्यानगर आणि धाराशिव या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ,बार्शी, अक्कलकोट, उत्तर व दक्षिण सोलापूर या तालुक्यांत प्रशासन अलर्ट आहे. जिल्ह्यात अद्याप २९ गावांत पाणी आहे, तर ज्या गावात पाणी ओसरले आहे त्या ठिकाणी स्वच्छता, टँकरद्वारे पाणी, आरोग्य सेवा, जनावराना चारा, धान्यवाटप सुरू आहे. तसेच पूरग्रस्त गावांत मदतीचा ओघ सुरू आहे. आम्हाला शासनाकडून धान्य मिळाले आहे. तसेच चारा मिळाला आहे. आता लाइट सुरू करावी, अशी मागणी माढा तालुक्यातील बबन शिंदे या शेतकऱ्याने केली आहे.
दुसरीकडे कायम दुष्काळी भागातील माण नदी दुथडी भरून वाहत आहे. सांगोला येथील माण नदीत म्हसवड येथील राजेवाडी प्रकल्पातून पाणी येत आहे. त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर भीमा अर्थात चंद्रभागा नदीत उजनी धरणातून १ लाख २५ हजार क्युसेक, तसेच वीर धरणातून नीरा नदीत ७ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदीतील हे पाणी पुढे अकलूजजवळील संगम येथे भीमा नदीत मिसळते हे पाणी पुढे भीमा नदीतून प्रवाहित होते. पंढरपुरातील भीमा अर्थात चंद्रभागा नदीत ७७ हजार क्युसेक इतके पाणी वाहत आहे. उजनी धरणातील पाणी चंद्रभागा नदीत रात्री पोहोचणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे.