पंढरपूर : कार्तिकी यात्रेत वारकरी भाविकांना दर्शनरांग, पत्राशेड, वाळवंट, भक्तिसागर (६५ एकर) येथे पाणीपुरवठा, आरोग्य, सुरक्षा, स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. तसेच, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विक्रेत्यांचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्यावर बसून साहित्य विक्री करणारे हातगाडे, फिरते विक्रेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी यांनी यात्रेसाठी करण्यात आलेल्या विविध कामांची, शौचालयाची पाहणी केली. दरम्यान, आज म्हणजे २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे.
कार्तिकी यात्रा कालावधीत लाखो वारकरी भाविक येतात. या कालावधीत पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या वतीने दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातत्याने प्रयत्नशील आहेत. प्रशासनाकडून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन शौचालयाची व्यवस्था, त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे का, स्वच्छता ठेवण्यात आली आहे का, शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुण्यासाठी ‘हँडवॉश’चीही सोय करण्यात आली आहे, त्याची पाहणी केली. शौचालय साफसफाई करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तसेच शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी जेटिंग व सक्शन मशिनची उपलब्धता करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या वाहनांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विक्रेत्यांचा त्रास होऊ नये, यासाठी शहरातील शिवाजी चौक परिसर, श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदिर परिसर, पुढे महाद्वार चौक परिसर या भागात साहित्य विक्री करणारे हातगाडे, फिरते विक्रेते यांना रस्त्यावर दुकान टाकण्यास बंदी करण्यात आली आहे.जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये ३१ ऑक्टोबर सकाळी ८ ते ५ नोव्हेंबर रात्री ८ या कालावधीत हातगाडीवाले, किरकोळ विक्रेते, फिरते विक्रेते, तसेच उक्त परिसरातील दुकानदार यांना अतिक्रमण करण्यास, रस्त्यावर दुकान लावण्यास, तसेच साहित्य विकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दरम्यान, यंदा कार्तिकी यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे.
