पंढरपूर : तालुक्यातील भोसे येथील दूध संकलन केंद्रातून दूध भेसळ करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे. येथील गुन्हा शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने डॉ. दत्तात्रय महादेव जाधव व सोनाली दत्तात्रय जाधव ( दोघे रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर, मूळ गाव सराफवाडी, ता. इंदापूर) यांना पकडले आहे. या प्रकरणातील अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दूध भेसळ प्रकरण अधिवेशनात गाजले होते.

तालुक्यातील भोसे येथील दत्तात्रय महादेव जाधव यांच्या मालकीच्या घरी व पत्राशेड या ठिकाणी अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. त्याठिकाणी दूध भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य व दूध भेसळीसाठी साठविलेले अन्न पदार्थ दूध, स्किम्ड मिल्क पावडर, व्हे परमिट पावडर, होल मिल्क पावडर, रिफाईण्ड पामोलिन तेल (राधुनी), अज्ञात पांढरे रासायनिक द्रावण हे पदार्थ आढळून आले होते.

या बाबत अधिक चौकशी केली असता दत्तात्रय महादेव जाधव हे दूध पावडर, तेल व अज्ञात पांढरे केमिकल यांच्या मिश्रणातून भेसळयुक्त दूध तयार करीत असल्याचे आढळून आले होते. तसेच भेसळयुक्त दूध मे. अनिकेत दूध संकलन केंद्र (सुगांव भोसे, ता. पंढरपूर) यांच्याकडे पुरवठा करीत असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार आरोपींना पकडण्यात यावे तसेच त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी माढा विधानसभेचे सदस्य अभिजित पाटील यांनी अधिवेशनात केली होती.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले करत आहेत. येथील गुन्हा शाखेचे पथक जाधव यांचा शोध घेत होते. त्यानुसार राजस्थान येथील खाटूबडी येथे जाधव असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी जाधव दाम्पत्याला अटक केली. तर अनिकेत बबन कोरके (रा. सुगाव भोसे) याला पुणे येथून तर पृथ्वीराज उर्फ सोन्या नवनाथ शिंदे (रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर) याला अकलूज येथून अटक केली आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब येथील सपोनि सागर कुंजीर, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश कांबळे, शरद कदम, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आवटी, सूरज हेंबाडे यांनी ही कामगिरी केली. दरम्यान, रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.