पंढरपूर : शहरातील घरगुतीसह सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती गोळा करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरात १४ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी केली आहे. तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी फिरत्या वाहनांची व संकलन केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी नगरपालिकेच्या ५६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेशरोकडे यांनी केले आहे.

घरगुती गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत. नागरिकांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर आपली गणेशमूर्ती द्यावी. त्या ठिकाणी पालिकेने जमलेल्या सर्व मूर्तींचे योग्य पद्धतीने विसर्जन करण्याची व्यवस्था केली असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शहरात अर्बन बँक प्रशासकीय इमारतीसमोर, भोसले चौक गणेश मंदिरासमोर, शेटे पेट्रोलपंपासमोर, कॉलेज चौक बस स्टॉप जवळ, ठाकरे चौक, सावरकर चौक गजानन मेडिकल समोर, शिवतीर्थ शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले पुतळ्यासमोर आदी ठिकाणी घरगुतीसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती गोळा करण्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत. दरम्यान, नदीपात्रात पाणी वाहते आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.