पंढरपूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या सात दिवसांत शास्त्रीय संगीत, अभंगवाणी, भक्ती संगीत, भरतनाट्यम् आदी कला सादर केली जाणार आहे. श्री संत तुकाराम भवन येथे दुपारी ५.३० ते ७ आणि रात्री ७.३० ते ९.३० या दोन सत्रांमध्ये कार्यक्रम होणार आहेत. कलापिनी कोमकली, पं. आनंद भाटे, पं. शौनक अभिषेकी यांच्यासह स्थानिक कलाकारांची संगीत मेजवानी सादर केली जाणार आहे.
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती नवरात्र, गणेश उत्सव, दिवाळी अशा सण-उत्सवात संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा नवरात्रीमध्ये दिग्गज कलाकार कला सादर करणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २३ सप्टेंबर रोजी पहिल्या सत्रात स्नेहल देशपांडे भरतनाट्यम् व रात्री कुमार गंधर्व यांच्या कन्या विदुषी कलापिनी कोमकली या सगुण–निर्गुण भक्तिसंगीत सादर करणार आहेत.
२४ सप्टेंबर रोजी दुपारी भरतनाट्यम् ‘परब्रह्मा’ सीमा जोशी व रात्री पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांचे गायन, तर २५ सप्टेंबर रोजी पंढरपुरातील प्रेरणा परदेशी यांचा नृत्यांजली आणि रात्री भैरवी किरपेकर आणि मधुरा किरपेकर यांचे गायन होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी दुपारी महेश काळे यांचे शिष्य स्वरपंढरी हा कार्यक्रम आणि रात्री ज्ञानेश्वर मेश्राम यांची अभंगवाणी, २७ सप्टेंबर रोजी दुपारी पंढरपुरातील लक्ष्मी बडवे शिष्य परिवार भरतनाट्यम्, तर रात्री सानिका कुलकर्णी यांचा अभंगगंध सादर करणार आहेत.
२८ सप्टेंबर रोजी दुपारी चेन्नईचे सौरभ नाईक अभंगवाणी, तर रात्री पं. शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी दुपारी श्रुती देशपांडे यांचे अभंगगायन, तर रात्री बंगळूरचे कीर्तीकुमार बडसेषे यांच्या भक्तिगीताने महोत्सवाची सांगता होणार आहे. श्री विठ्ठल मंदिरानजीक श्री तुकाराम भवन येथे रोज हा कार्यक्रम होणार आहे. रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.
नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी
येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव संपन्न होत आहे. या काळात रखुमाईला विविध पारंपरिक पोषाखासह अलंकाराने सजविण्यात येते. तसेच नवरात्र उत्सव कालावधीत सभामंडप येथे भजन, कीर्तन, गोंधळ, पंचसुक्त पवमान अभिषेक, रुक्मिणी स्वयंवर कथा, रुक्मिणी स्वयंवर सामुदायिक ग्रंथ पारायण व महिला भजनी मंडळांचे भजनगायन संपन्न होणार आहे. दर वर्षी राज्यासह परराज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.