पंढरपूर : आषाढी यात्रेमध्ये लाखो भाविकांसाठी गेली १७ दिवस २४ तास उभे असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शिणवटा काढण्यात आला. आषाढी यात्रे नंतर प्रक्षाळपूजा केली जाते. विठूरायाला गरम पाणी व दह्यादूधानं स्नान घालण्यात आलं आणि आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरु करण्यात आले .दरम्यान,प्रक्षाळ पूजे निमित्त पुणे येथील भाविकाने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मंदिराच्या गर्भगृहास व मंदिरास फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. 

आषाढी यात्रेत लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी विठूराया अहोरात्र उभा होता.यात्रा सुरू झाल्यावर सलग १७ दिवस मंदिरात २४ तास दर्शन सुरू असल्याने विठ्ठलाला थकवा न येण्यासाठी पाठीला  लोड लावण्यात आला होता. याकाळात देवाचे सर्व नित्योपचार बंद होते. ते आज पूर्ववत  करण्यात आले. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे. यासाठी आज दुपारपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर देवाच्या पायाला चोळून दर्शन घेत होते. यामुळे थकलेल्या पायाच्या शिरा मोकळ्या होतात अशी भावना भाविकांची आहे.

यानंतर ब्रह्मवृंदाच्या रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह  प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात आहे. यानंतर देवाला सुंदर पोशाख परिधान करण्यात आला. तसेच हिरे-माणिकांच्या दागिन्यांनी सजविण्यात आले. मस्तकी सुवर्ण मुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभ मणी, भाळी निळ्या हिऱ्यांचा नाम, दंडाला दंड पेट्या अशा अलंकारात नटलेल्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी व पुतळ्याची माळ असे पारंपारिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते.देवाचा शिणवटा घालवण्यासाठी रात्री गवती चहासह विविध प्रकारचे १५ ते १६ आयुर्वेदिक पदार्थांचा काढा झोपण्यापूर्वी दिला जातो. या काढ्यामुळे देवाला पूर्ण विश्रांती मिळून चांगली झोप लागते असे मानतात. पुण्यातील एका भाविकाने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे गर्भगृह आणि मंदिरास विविध फळ आणि आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. दरम्यान या पूजे नंतर देवाचे नित्योपचार  पुन्हा सुरु झाले आहेत. असे असले तरी प्रक्षाळ पूजे आधी आणि नंतर  सगळे विधी पार पडत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जातात आणि आलेला शिणवटा जाऊन पुन्हा चेहरा प्रसन्न दिसू लागतो, अशी भावना वारकऱ्यांची आहे