सावंतवाडी : जयवंत दळवी यांचे साहित्य वास्तववादी असून त्यात आशय आणि विषय ठासून भरलेला आहे, असे मत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी मालवण येथे व्यक्त केले. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘जयवंत दळवी: व्यक्ती आणि साहित्य’ या चर्चासत्रात ते बोलत होते. साहित्य अकादमी आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विश्वास पाटील म्हणाले की, ‘चक्र’ आणि ‘अंधारातल्या पारंब्या’ या कादंबऱ्या नव्या लेखकांसाठी एक आदर्श आहेत. दळवींच्या साहित्यात शब्दांचे सामर्थ्य असूनही, मराठी समीक्षकांनी त्यांच्या साहित्याची योग्य दखल घेतली नाही आणि त्यांना म्हणावी तशी पारितोषिकेही मिळू शकली नाहीत. मात्र, दळवी त्यांच्या लेखणीच्या जोरावर आजही साहित्याच्या जगात टिकून आहेत.
पाटील यांनी ‘चक्र’ कादंबरीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, ‘चक्र’ हा चित्रपट चांगला असला तरी, कादंबरीचा मूळ आशय आणि विषय चित्रपटात केवळ १५ टक्केच उतरला आहे. कादंबरीतील शब्दांची निवड इतकी प्रभावी आहे की तिची एक चांगली डिक्शनरी होऊ शकते. या कादंबरीत झोपडपट्टीतील जीवन वेदनादायी आणि वास्तववादी पद्धतीने चित्रित केले आहे. दळवींचे साहित्य भाऊ पाध्ये यांच्या साहित्यापेक्षा अधिक प्रभावशाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
कमी पानांच्या कादंबऱ्यांमध्येही मोठा आशय मांडता येतो, याचे उदाहरण म्हणून पाटील यांनी ‘अंधारातल्या पारंब्या’ या कादंबरीचा उल्लेख केला. दळवींचे साहित्य आशयघन असल्याने मराठी साहित्यासाठी ते अनमोल आहे, असेही त्यांनी म्हटले.
या कार्यक्रमाला जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी, साहित्यिक प्रवीण बांदेकर, साहित्य अकादमीचे ओमप्रकाश नागर, ऍड. देवदत्त परुळेकर, कवी महेश केळूसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रवीण बांदेकर यांनी दळवींच्या साहित्यावर समीक्षात्मक व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती तोरस्कर यांनी केले, तर लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी आभार मानले.