भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षात वरिष्ठांकडून सातत्याने डावललं जात असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा पर्याय काही वरिष्ठांनी सूचवल्याचंही समजत आहे. या सर्व चर्चांवर पंकजा मुंडे यानी दसरा मेळाव्यातून भाष्य केलं आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी मी स्वाभिमान गहान टाकणार नाही, असं सूचक वक्तव्यही पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

भगवान भक्तीगड येथे दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या, “भगवान बाबांचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. भगवान बाबांनादेखील दुसरा गड बनवावा लागला. तसेच आपणही भगवान गडावरून भगवान भक्ती गडाकडे आलो आहोत. श्रीकृष्णालाही मथुरा सोडावी लागली आणि द्वारकात वसावं लागलं. तशीच आज आपलीही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या लोकांच्या मनात काहूर आहे, लोकांच्या मनात प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं मी गेल्या काही दिवसांपासून शोधत आहे. तुमच्या मनातलं उत्तर मला माहीत आहे. तुम्ही खाली बसून ओरडत आहात, ते मी ऐकत आहे.”

हेही वाचा- “न जाने मुझे कैसे परखता है मेरा उपरवाला..”, पंकजा मुंडे यांचं सावरगावातू जोरदार भाषण

“मी आता तुमची ताईसाहेब राहिली नाही, मी तुमची आई आहे. बापाला जेव्हा दु:ख होतं, व्यसन लागतं, कर्ज होतं, तेव्हा तो झाडाला लटकून मरतो. पण आईला नवऱ्याने मारलं, सासरच्यांनी छळलं, लेकरांनी लक्ष नाही दिलं तरी तिला जीव द्यावा वाटत नाही. कारण आईचा जीव लेकरांत अडकलेला असतो,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा- “आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू”, भगवान भक्तीगडावरून पंकजा मुंडेंचा निशाणा; रोख कोणावर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राजकारणामध्ये मी नेत्या, ताई, ताईसाहेबांपासून आता आईच्या भूमिकेत आहे. त्यामुळे माझ्या लोकांचं हित बघणं, त्यांना न्याय देणं, हे माझं परम कर्तव्य आहे. कुणा दुसऱ्यांचं हडपून खाणं, हे माझं परम कर्तव्य नाही. इकडची जागा लढा.. तिकडची जागा लढा.. प्रीतमताई घरी बसतील.. तुम्ही लढा.. आता असलं काहीही चालणार नाही. कारण मी कुणाच्या मेहनतीचं खाणार नाही. एकवेळ मी तुमच्यासाठी मेहनत करेन. तुम्ही म्हणाला तर ऊस तोडायला जाईन, कापूस वेचायला जाईन, पण स्वाभिमान गहाण टाकू शकणार नाही,” अशी रोखठोक भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली आहे.