Pankaja Munde आज माझे पिता, आपले सगळ्यांचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कर्मभूमी असलेल्या लातूर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला. या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला जे उपस्थित आहे ते आपले मुख्यमंत्री आहेत. त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून पुतळ्याचं उद्घाटन करावं ही गोपीनाथ मुंडेंचीच इच्छा असेल असं पंकजा मुंडे यांनी या वेळी झालेल्या कार्यक्रमात म्हटलं आहे.
गोपीनाथ मुंडेंचं जेव्हा निधन झालं तेव्हा….
आजचा दिवस असा आहे की काय बोलावं मला कळत नाही. ज्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर त्या धक्क्यात आम्ही सगळेच होतो. मी जेव्हा रुग्णालयात गेले तेव्हा दिल्लीत मला कुणीही ओळखीचं वाटत नव्हतं. त्यावेळी देवेंद्रजी गोपीनाथ मुंडेंच्या मृतदेहाजवळ उभे होते. त्यावेळी मी देवेंद्रजींना हाक मारत टाहो फोडला होता. मला नितीन गडकरींनी फोन करुन काय घडलं आहे ते सांगितलं होतं. मी रुग्णालयात जाईपर्यंत ते असतील अशी माझी भाबडा अपेक्षा होती. मला त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप दिवस मला लागले.
मला गोपीनाथ मुंडे धन्यवाद असं म्हणाले होते
गोपीनाथ मुंडे यांच्यावर डॉक्युमेंट्री बनवली होती त्यावेळी काय ओळी म्हणाव्या ते सुचत नव्हतं. ‘एक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी.’ अशा ओळी म्हणत असताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले होते. गोपीनाथ मुंडे यांनी जीवनात काय कमावलं मला माहीत नाही. कारण मी त्यांची वारस आहे, वारस तर सगळेच आहेत. मला २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी धन्यवाद म्हणाले. मी त्यांना विचारलं असं का म्हणता? त्यावर ते मला म्हणाले की डझनभर आमदार मला पाडायला बसले होते. विधानसभेत माझी एकच लेक १२ आमदारांना भारी पडली. त्यामुळे माझा वारसा मी निवडला. मला त्यांनी जिवंत असतानाच त्यांची वारस म्हणून घोषित केलं आहे. वारसा काय असतो तो मी अनुभवलं आहे. माझे वडील माझे गुरु होते. त्यांनी काय करायचं ते शिकवलं नव्हतं, पण काय करायचं नाही ते शिकवलं होतं.
मी लोकांकडे काय मागू?
मी लोकांकडे काय मागू? लोकांचं प्रेम तेव्हा कळतं जेव्हा माणूस कुठल्या पदावर नसतो. गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर एका मुस्लिम तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. असंख्य तरुण आत्महत्या करत होते, वेडे झाले होते. हे सगळं काय आहे? हे सगळं प्रेम आहे. असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. लोकांची ही संपत्ती मला कुठलीही पत, प्रतिष्ठा, संपत्ती यापेक्षा महत्वाची आहे. मला गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं होतं बेरजेचं गणित करायचं असतं. देवेंद्र फडणवीस यांनी ते गणित तंतोतंत पाळलं आहे. जनतेच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तहही करावे लागले आणि युद्ध करावं लागलं. मला अनेकवेळा संघर्ष करावा लागला. पण मी कुणाबद्दलच विष बाळगलं नाही. प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं हेच माझ्यावर त्यांचे संस्कार होते.
विलासराव देशमुख यांचीही आठवण
प्रांजळ आणि सोज्ज्वळ राजकारणाचं उदाहरण गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांनी दाखवून दिलं. आज गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा पाहताना मला विलासराव देशमुखांचीही आठवण झाली असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.