परभणी : काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच भेट घेतली असून वरपूडकर हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला यामुळे दुजोरा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वरपूडकरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असली तरी येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे संकेत आहेत.

वरपूडकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाचे प्रतोद म्हणूनही त्यांच्यावर यापूर्वी जबाबदारी होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत पाथरी मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर वरपूडकर काँग्रेस पक्षात अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते.सुरुवातीला दीर्घकाळ राष्ट्रवादीत घालवलेल्या वरपुडकरांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, त्यानंतर या पक्षात ते चांगलेच स्थिरावले. काँग्रेसलाही वरपूडकरांच्या रूपाने जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक ताकद असलेला नेता मिळाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरपूडकर पाथरी मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या हाती आली. पाथरी मतदार संघाआधी त्यांनी सिंगणापूर या विधानसभा मतदारसंघातून दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले.

अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर वरपूडकरही काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देतील असा तर्क व्यक्त केला जात होता पण वरपूडकर काही महिने काँग्रेस पक्षातच राहिले. तरीही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ते प्रवेश करणार असल्याची चर्चा लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरू होती. त्यावेळी त्यांच्याच काही समर्थकांनी जर सत्ताधारी पक्षात जायचेच तर मग थेट भाजपमध्येच जायला हवे असा आग्रह धरला. विधानसभा निवडणुकीनंतर वरपुडकरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा हे नांदेडला येऊन गेले, त्यावेळी त्या कार्यक्रमात मराठवाड्यातील काही नेत्यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळीही वरपूडकरांचा प्रवेश त्याच कार्यक्रमात होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या कार्यक्रमात हा प्रवेश झाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वरपूडकरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. विशेषतः पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर वरपूडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या वर्तुळात बोलले जाऊ लागले. सध्या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची नेतृत्वाची धुरा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हाती आहे. बोर्डीकरांच्या सहमतीशिवाय वरपूडकरांचा भाजप प्रवेश होणार नाही. बोर्डीकर हे वरपुडकरांच्या प्रवेशाला हरकत घेतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नुकतीच वरपूडकर यांनी बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हेही हजर होते. यावरून वरपूडकर यांच्या भाजप प्रवेशाला आता बोर्डीकरांची सहमती असल्याचे मानले जात आहे. वरपूडकर यांचा भाजप प्रवेश झाला तर काँग्रेसचे कोणते स्थानिक नेते त्यांच्यासोबत असतील याबाबत मात्र उत्सुकता आहे.