परभणी : पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली असून काल रविवारच्या विश्रांतीनंतर आज सोमवारी (दि.१८) सकाळपासूनच जोरदार बरसायला प्रारंभ केला आहे. दरम्यान येलदरी जलाशयाचे १० दरवाजे आज सकाळीच उघडण्यात आले असून निम्न दुधना प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सलग तीन दिवसानंतर पावसाने रविवारी विश्रांती घेतली मात्र आज सकाळपासूनच पाऊस बरसू लागला आहे. पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून आज सोमवारी (दि.१८) सकाळी पावणेआठ वाजता दहा दरवाजे ०.५ मिटरने उघडून पूर्णा नदीपात्रात २११००.४९ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्याचबरोबर या धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या खडकपूर्णा धरणातूनही विसर्ग चालू असल्याने आज सकाळी ७.४५ वाजता येलदरी धरणाचे पहिल्यांदा सहा दरवाजे उघडण्यात आले त्यानंतर एकूण दहा गेट ०.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्याद्वारे २११००.४९ क्यूसेस इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.तसेच येलदरी जलविद्युत केंद्राच्या गेटद्वारेही २७०० क्यूसेस पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाने म्हटले आहे.

दरम्यान सेलू तालुक्यातील निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आज सकाळी आठ वाजता धरणाचे गेट क्र.१ व २० हे ०.२० मीटरने उघडण्यात आले असून त्याद्वारे १३१९.३७ क्यूसेस इतका विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. असा इशारा निम्न दुधना प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्ह्यात विशेषतः पूर्णा तालुक्यात काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून शेतात पाणी शिरले आहे. काल रविवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी पाणी शिरलेल्या शेतात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना पंचनामाचे आदेश दिले आहेत. गेल्या तीन-चार दिवसातील पावसामुळे जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना या दोन्ही धरणांतील जलसाठे तुडुंब भरले असून भविष्यातील पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे.